S M L

पिवळ्या कलिंगडातून 'सोनेरी' कमाई, प्रियांका मेमाणेंची यशोगाथा

प्रियांकाताईंनी नवा प्रयोग करण्याचा ध्यास बाळगला आणि हा प्रयोग यशस्वी करुन दाखवलाय. अवघ्या 2 महिन्यात त्यांनी 2 ते अडीच लाखांची नफा कमाई करुन दाखवलीय.

Sachin Salve | Updated On: May 1, 2018 06:33 PM IST

पिवळ्या कलिंगडातून 'सोनेरी' कमाई, प्रियांका मेमाणेंची यशोगाथा

बाळासाहेब काळे,पुरंदर, पुणे

01 मे : पुणे जिल्ह्यातल्या दुष्काळी पुरंदर तालुक्यात फळपिक लागवडीत नवनवे प्रयोग करण्यात आता महिला शेतकऱ्यांनीही आघाडी घेतलीये. पारगाव मेमाणे गावच्या प्रियांकाताई मेमाणेंनी यंदा अवघ्या 1 एकरात केलेल्या रंगीत कलिंगड लागवडीतून 3 लाखांच्या कमाईपर्यंत मजल मारलीय.

पुणे शहरापासून जवळच असलेल्या पुरंदर तालुक्यात गेल्या अनेक दशकांपासून फळपिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जवळच असलेलं पुण्याचं मार्केट लक्षात घेता इथल्या शेतकऱ्यांचा फळशेतीमध्ये हातखंडा आहे. पारगाव मेमाणेवाडीच्या प्रियांकाताईं देखील गेल्या काही वर्षांपासून फळपिकांची शेती मोठ्या जोमानं करतायत. यासाठी त्यांनी शेततळं खोदलंय. पाण्याची सोय झाल्यानंतर यंदा त्यांनी 1 एकरात पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या रंगीत कलिंगडाची लागवड केलीय.प्रियांकाताईंनी पाण्याचं व्यवस्थापन योग्यरित्या होण्यासाठी ठिबकचा वापर केला. यामध्ये त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच ताईवानहून आणलेल्या बियाण्याची लागवड केली. सेंद्रीय पद्धतीनं नियोजन करण्यावर भर दिला. कंपनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खतं आणि पाण्याचं तसंच कीडनाशक फवाऱ्यांचं नियोजन केलं. यामुळं त्यांचं पिक यंदा चांगलं साधलंय.

पिवळ्या रंगीत कलिंगडाच्या लागवड आणि उत्पादनात सातत्य राखण्यात तसंच उत्पादन यशस्वी करण्यात प्रियांकाताईंना मोठं यश मिळालंय. प्रयोगशील वृत्ती आणि अभ्यासू स्वभाव यामुळं हे शक्य झालंय. रंगीत फळं तसंच विदेशी वाण या दोन्ही बाबी असूनही त्यांनी उत्पादनातला उच्चांक गाठलाय. आतापर्यंत त्यांना 15 टन कलिंगडाचं उत्पादन हाती आलंय. तर आणखी 10 ते 15 टन उत्पादन हाती येणार असल्याची त्यांची खात्री आहे.

Loading...

मेमाणेंकडील या रंगीत कलिंगडाची विक्री सध्या पुण्यात मॉलमध्ये सुरू आहे. त्याला चांगला भाव मिळतोय. आतापर्यंत कलिंगडाच्या विक्रीतून त्यांना किमान दीड लाखांचं उत्पन्न मिळालंय. तर आणखी दीड लाख त्यांच्या हाती येणार आहेत. या उत्पादनाच्या खर्चासाठी लागलेले 50 हजार रुपये वगळता त्यांना अंदाजे अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती येईल अशी खात्री वाटतेय.

प्रियांकाताईंनी नवा प्रयोग करण्याचा ध्यास बाळगला आणि हा प्रयोग यशस्वी करुन दाखवलाय. अवघ्या 2 महिन्यात त्यांनी 2 ते अडीच लाखांची नफा कमाई करुन दाखवलीय. त्यांच्याकडं पाहून या भागातल्या काही महिला शेतीत यशस्वी प्रयोग करण्यासाठी नक्की पुढे येतील अशी आम्हाला खात्री आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 06:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close