गणेशोत्सवाचं ‘मॅनेजमेंट’ : ‘गणेश गल्ली’चा राजा म्हणजे कार्यकर्त्यांना घडवणारी शाळा

गणेशोत्सवाचं ‘मॅनेजमेंट’ : ‘गणेश गल्ली’चा राजा म्हणजे कार्यकर्त्यांना घडवणारी शाळा

मुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. गणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' मधून. दुसरं मंडळ -लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, म्हणजेच गणेशगल्ली, मुंबईचा राजा.

  • Share this:

लालबाग म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे लालबाग. ‘गणेश गल्ली’चा राजा हा लालबागचा सर्वात जुना आणि मानाचा गणपती. 1928 मध्ये गणेश गल्लीच्या राजाची स्थापना झाली. यंदाचं वर्ष हे या मंडळाचं 91 वं वर्ष आहे. या 9 दशकांतल्या उत्कृष्ट मॅनेजमेंटमुळच गणेशगल्लीचा राज हा आज ‘मुंबईचा राज’ झालाय. लालबागमध्ये आलेला भाविक राजाचं दर्शन न घेता गेला असं कधीच होत नाही. एखाद्या संस्थेच्या दृष्टीनं 90 वर्षांचा कालावधी हा फार मोठा कालावधी आहे. शतकोत्सवाकडे जाणाऱ्या या मंडळाने आपल्या कामाने आज छाप सोडली आहे. मुंबईसारख्या धावणाऱ्या शहरामध्ये एखादा साधा कार्यक्रम करायचा असला तरी आयोजकांची दमछाक होते. कार्यकर्त्यांची जमवाजमव करतांना त्यांच्या तोंडाला फेस येतो. घडाळ्याच्या काट्यांवर धावणाऱ्या माणसांच्या या शहरात 90 वर्ष उत्सव वाढवत येणं आणि त्याचा दर्जाही टिकवून ठेवणं ही साधी गोष्ट नाही. मात्र राबणारे कार्यकर्ते, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीच्या जोरावर अनेक मोठे उपक्रम या मंडळाने यशस्वी पार पाडल्याचं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी ‘न्यूज18 लोकमत’शी बोलताना सांगितलं.

कार्यकर्त्यांचं मोहोळ

कुठलाही कार्यक्रम कितीही मोठा असू देत तो यशस्वी होतो तो केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर. खंदे कार्यकर्ते हे या मंडळाची ताकद आहे. सध्या मंडळाकडे 4 हजार कार्यकर्त्यांची नोंद आहे. जस जसा उत्सव जवळ येत जातो तशी त्यात आणखी भर पडत जाते. यातले बहुसंख्य कार्यकर्ते हे नोकरी आणि आपला व्यवसाय करणारे. मात्र उत्सवाच्या 10 दिवसांमध्ये कुठलही काम असलं तरी त्यांची सेवा कधीच चुकत नाही. गणेशोत्सवाच्या काळात ऑफिसमध्ये रजा मिळाली नाही तर नोकरी सोडून उत्सवात सहभागी होणारे अनेक कार्यकर्ते आहेत असं स्वप्निल परब अभिमानाने सांगतात. कारण जो आनंद त्यांना या दहा दिवसांमध्ये मिळतो तो आनंद आणि ऊर्जा त्यांना वर्षभर पुरत असते. आणि दुसरी नोकरी मिळवण्याची धमकी असल्यानं कार्यकर्ते बाप्पांसाठी असं धाडस दाखवतात. असे धडाडीचे मावळे असतील तर कुठलं काम यशस्वी होणार नाही असा सवालही त्यांनी केला.

सहा महिने आधीच होते नियोजनाला सुरवात

गणेशोत्सव झाल्यानंतर काही महिने गेले की लगेच कार्यकर्त्यांच्या डोक्यात दुसऱ्या वर्षीच्या नियोजनाचा विचार सुरू होतो. मंडळातल्या खास क्रिएटीव्ह कार्यकर्त्यांचा एक गट पुढच्या वर्षीच्या थिमचा विचार करत असतो. मे महिन्यात सर्व कार्यकारणीची बैठक होते. त्यात या क्रिएटीव्ह गटानं पुढं केलेल्या नव्या कल्पनांवर विचार केला जातो आणि त्यातून सर्वोत्तम थिम निवडली जाते. दरवर्षी गुरूपोर्णिमेला मुंबईच्या राजाचं पाऊल पुजन होतं आणि कामाला औपचारीक सुरूवात होते. या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कामांचा रतीब कधीच संपत नाही.

 काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी

गेल्या 90 वर्षांमध्ये उत्सवाचं स्वरूप अमुलाग्र बदलत गेलं. मात्र त्याचं स्पिरिट कधीच कमी झालेलं नाही. उत्सवाची थीम ठरवणं, त्यांची अंमलबजावणी करून घेणं, प्रत्यक्ष स्थापनेचा दिवस, नंतरच्या 9 दिवसांचं नियोजन, अनंत चतुर्दशीच्या मिरवणूकीची तयारी, गर्दीचं व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टींसाठी आता मंडळाची चांगलीच तयारी झालीय. एवढ्या वर्षांचा अनुभव पाठिशी असल्यानं कामांची चौकट ठरलेली आहे. त्यात फारसा बदल होत नाही. यासाठी नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचाही मेळ घातला जातो. नव्या कार्यकर्त्यांसाठी ती शिकण्याचीही एक शाळाच असते. यात सगळ्यात महत्वाचं असतं ते ठरलेल्या वेळेत त्याची अंमलबजावणी करून घेणं. ही डेडलाईन चुकली की सर्वच गणित बिघडतं. त्यामुळं प्रत्येक विभागाचे गटप्रमुख आपली डेडलाईन पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या साथीला अनेक हात असतात त्यामुळे त्यांनाही काम पूर्ण होण्याचा कायम विश्वास असतो.

भव्य मंदिरांच्या प्रतिकृती हे आकर्षण

भारतातल्या उत्तम, प्राचीन आणि भव्य मंदिरांच्या प्रतिकृती उभारणं ही या मंडळाची खासियत आहे. अनेक नागरिकांना तिर्थयात्रांना जाणं शक्य नसतं. जे लोकांना बघायला मिळत नाही ते ते उभारणं हा मंडळाचा उद्देश आहे. सुरूवातीची अनेक वर्ष सामाजिक देखावे उभारले जात होते. 2002 हे वर्ष मंडळाचं अमृतमहोत्सवी वर्ष होतं या वर्षी भव्य मंदिराची कल्पना समोर आली आणि तेव्हापासून हा पायंडाच पडला. भारतातल्या अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरांच्या प्रतिकृती मंडळानं उभारल्या असून त्यांना लोकांचाही उदंड प्रतिसाद मिळालाय. यावर्षी ग्वाल्हेरच्या सूर्यमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. कोणार्कच्या भव्य सूर्यमंदिराची प्रतिकृती असलेलं हे मंदिरही देखणं आहे. 1988 मध्ये जीडी बिर्ला या उद्योगपतींनी ग्वाल्हेरचं सूर्यमंदिर बांधलं होतं. अमन विधाते हे कला दिग्दर्शक या मंदिराची प्रतिकृती उभारत आहेत. 100 कारागिरांची त्यांची टीम ही महिनाभरापासून या प्रकल्पावर काम करत आहेत. फायबर मध्ये हे मंदिर तयार होणार असून यावर्षीचं आकर्षण राहणार आहे.

गर्दीचं नियोजन हे आव्हान

गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये दररोज किमान लाखभर भाविक दर्शन घेऊन जातात. सकाळचा काही वेळ सोडला तर 24 तास दर्शन सुरूच असते. सायंकाळनंतर गर्दी वाढत जाते आणि रात्री तर गर्दीचे सर्व उच्चांक मोडतात. त्यामुळं कार्यकर्त्यांना क्षणाचाही उसंत नसते. बाप्पांचा मुख्य गाभारा आणि मंदिरातली व्यवस्था पाहण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांच्या टिम्स् मंडळाने तयार केल्या आहेत. दिवस रात्र ही मंडळी अगदी चोखपणे आपलं काम पार पाडतात त्यामुळे कुठेही गर्दीचा त्रास होत नाही आणि कार्यकर्तेही कधीच थकत नाही.

गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात बाप्पांची दररोजच्या आरतीचा मान खास लोकांना देण्याची या मंडळाची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या काळात रात्रंदिवस राबणारे पोलीस, सफाई कर्मचारी, नर्सेस,दूध विक्रेते, फायरब्रिगेडचे कर्मचारी, यांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान दिला जातो. याचं नियोजन गणेशोत्सवाच्या आधीच करून त्या त्या लोकांना त्याची सूचनाही देण्यात येते. हा सन्मान त्यांच्या सेवेचा कर्तव्याभावनेचा आणि त्या विभागाचा असतो. त्या लोकांनाही आपल्या कामाची कुणी दखल घेतली याचा आनंद असतो अशी भावना मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी व्यक्त केलीय.

दहा दिवसांचा अनुभव आयुष्यभर पुरणारा

गणेशोत्सवाच्या काळात कार्यकर्त्यांना येणारा अनुभव हा त्यांना आयुष्यभर पुरणारा असतो. कार्यक्रम ठरवणं, त्याची आखणी करणं,  बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून नियोजन करणं, अडचणी आल्या तर त्यावर मात कशी करायची हे शिकणं हा कार्यकर्त्यांसाठी समृद्ध करणारा अनुभव असतो. हा अनुभव त्यांच्या वयक्तिक आयुष्यातही कामी येतो. आहे त्या परिस्थितीत काम करणं. संकटांवर मात करत पुढं जाणे आणि जे मिळतं त्याचा उत्सव करत सगळ्यांना आनंदी दणं यापेक्षा आयुष्यात दुसरं काय पाहिजे? गणेशोत्सव हा याच आनंदाची पेरणी करणारा आयुष्याचं नियोजन उत्तमपणे करायला शिकवणारा उत्सव आहे.

 

 

 

 

First published: August 24, 2018, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading