अटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता

अटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता

अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले वाजपेयी पत्रकार, कवी, लेखक, विचारवंत, राजकीय नेते तर होतेच पण त्यांची खरी ओळख होती ती एक सह्रदयी, दिलदार, निखळ मनाचा माणूस म्हणून.

  • Share this:

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय जनमानसावर ज्या मोजक्या नेत्यांनी आपली छाप सोडली त्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच स्थान फार वरचं आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले वाजपेयी पत्रकार, कवी, लेखक, विचारवंत, राजकीय नेते तर होतेच पण त्यांची खरी ओळख होती ती एक सह्रदयी, दिलदार, निखळ मनाचा माणूस म्हणून.

1924 च्या डिसेंबर महिन्यातल्या 25 तारखेला कृष्णबिहारींच्या कुटुंबात सरस्वतीपुत्राचा जन्म झाला. या कुटुंबाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की ग्वाल्हेरच्या मातीत खेळणारा हा मुलगा एक दिवस आपल्या शब्दांच्या बळावर देशातील कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल. देशाचा लोकप्रिय पंतप्रधान बनेल. भारतरत्न ठरेल. खरंतर शब्दांचं सामर्थ्य अटलजींकडे त्यांच्या वडिलांकडूनच आलं होतं.

कॉलेजच्या दिवसापासूनच अटलजींच्या शब्दांनी लोकांना वेड लावलं. त्यांच्या जीभेरवरच्या सरस्वसतीनं अनेकांना मोहीत केलं. एका छोट्या शहरातल्या हा मुलगा विद्यार्थी नेता म्हणून नावारुपाला येत होता. कर्तृत्व गाजवत होता. कानपूरच्या डीएमए कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचं शिक्षण घेतल्यावर अटलजींनी कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. याच दरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते त्याच विचारधारेशी अटल राहिले.

1951 साली तरुण अटलजींमधला स्पार्क पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या नजरेत भरला. त्यांनी अटलजींना कानपूरहून लखनऊमध्ये बोलावलं. त्यांच्यावर 'राष्ट्रधर्मा' या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवली. याच दरम्यान शामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली आणि तिथूनच अटलजींच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा झाला.

1957 साली बलरामपूरमधून अटलजींनी पहिल्यांदा आपलं नशीब आजमावलं. लोकांनी विश्वास दाखवला आणि ते देशाच्या संसदेत पोहोचले. त्यावेळी जनसंघाचे केवळ 4 खासदार होते. शब्दांचा हा धनी राजकीय पटलावर आपली ओळख निर्माण करत होता. पण राजकारणात असूनही कवीमनाच्या अटलजींनी त्यांच्यातली संवेदना कधी हरवू दिली नाही. कवितेनं त्याचं राजकारण समृद्ध केलं.

आयुष्याचं रोज नवं गाणं लिहिणाऱ्या या कवीला अनेक अग्नीपरीक्षांनाही सामोरं जावं लागलं. दिनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर अटलजींच्या खांद्यावर जनसंघाची जबाबदारी आली. ही जबाबदारी लिलया पेलत त्यांनी पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचं रान केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या इंदिरा गांधींनी 1975 साली आणीबाणी लादली. त्यात सरकारनं अटलजींना जेरबंद केलं. पण 77 साली झालेल्या निवडणुकीत देशातल्या जनतेनं आणीबाणीविरोधात कौल दिला. मोराजजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अटलजी परराष्ट्र मंत्री बनले. आपल्या मंत्री पदाच्या काळात अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठारून हिंदीतून भाषण करत देशाचा गौरव वाढवला.

अंतर्गत गटबाजीनं मोरारजींचं सरकार कोसळलं. इंदिरा गांधींना पर्याय देण्याचं स्वप्न भंगलं. अटलजी अस्वस्थ झाले. 80च्या दशकात जनता पक्षाचे नेते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. त्याची जबाबदारी अटलजींवर आली तेव्हाच त्यांनी भविष्यवाणी व्यक्त केली होती. अंधेरा छटेगा कमल खिलेगा. अटलजींचं भविष्य खरं ठरलं आणि 1996 साली केंद्रात भाजपचं सरकार आलं. अटलजी पंतप्रधान बनले. पण संख्याबळांच्या अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलं. त्या दिवशी संसदेतलं त्यांचं भाषण संसदीय इतिहासातलं एक सोनेरी पान होतं. त्यांना संख्याबळ जमवता आलं नाही. त्यामुळे 13 दिवसात अटलजींचं सरकार कोसळलं. सरकार 13 दिवसांचं असलं तरी अटलजींनी देशातील जनतेची मनं जिंकली होती.

पुन्हा निवडणुका झाल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आलं आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. देशाच्या चार दिशा जोडणाऱ्या स्वर्णिम चतुर्भूज योजनेतून अटलजींचा द्रष्टेपणा, शस्त्रूराष्ट्र पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करत दिल्ली-लाहोर बससेवा सरु करणाऱ्या अटलजींचा शांततेवरचा अटल विश्वास, जगाच्या दबावाला झुगारत पोखरणमध्ये अणू चाचणी करत दाखवलेला कणखरपणा, देशातलं पहिलं टिकलेलं गैरकाँग्रेसी सरकारं देणारं नेतृत्व, मुल्यांसाठी सत्तेला लाथ मारण्याची धमक दाखवणारी तत्वनिष्ठा, गुजरात दंगलीवेळी मोदींना राजधर्माची आठवण करून देणारी अटलजींची कर्तव्यनिष्ठाही या देशानं पाहिली. म्हणूनच अटलजीचं व्यक्तित्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरक, आश्वासक आणि मार्गदर्शक ठरलं. त्यामुळेच वाजपेयी जात, पात, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्यांच्या पलिकडचे आदर्श लोकनेता बनले. अटलजी काळाच्या पडद्याआड गेलेत... पण त्यांचा आवाज... त्यांचे शब्द... आणि त्याची व्यक्तित्व भारताच्या इतिहासात अजरामर राहील.

 

 

First Published: Aug 16, 2018 05:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading