#Durgotsav2018 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून डॉक्टरेट मिळविणारी एकमेव महिला!

#Durgotsav2018 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून डॉक्टरेट मिळविणारी एकमेव महिला!

दुर्गा, आदि, शक्ती याबरोबरच देवीची पूजा होते विद्येची देवता म्हणून. विद्यार्जनाची आस कायम ठेवून ५० व्या वर्षी डॉक्टरेट मिळवून आता एका विद्यापीठाच्या अधीक्षकपदावर पोहोचलेल्या एका सरस्वतीच्या उपासिकेची ही प्रेरक कथा.

  • Share this:

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. सामान्यांमधल्या असामान्य स्त्रिया शोधून त्यांच्या जिद्दीचा, मेहनतीचा जागर करण्याच्या उद्देशानंच हा दुर्गोत्सव. 

 

राम देशपांडे

आयुष्यात काही मिळवायचं असेल तर संघर्ष हा अटळ असतो. पण पदोपदी संघर्षाचा सामना करत, कौटुंबिक जबाबदारीही नेटाने पार पाडत असताना आयुष्याच्या पन्नाशीत शोधनिबंध सादर करून अधीक्षक पदावर विराजमान होणाऱ्या डॉ. स्मिता साठे (पूर्वाश्रमीच्या स्मिता जोशी) यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय. विद्यापीठाच्या इतिहासात नॉन टिचिंग स्टाफ अर्थात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून पीएचडी करत डॉक्टरेट मिळविणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या आहेत.

पितृछत्र हरपल्यानं वयाच्या 11 व्या वर्षीच डॉ. स्मिता यांच्या संघर्षमय जीवनाला सुरूवात झाली. आईच्या जेमतेम पगारात घरातल्या पाच-सहा जणांची पोटं भरणं अशक्य झालेलं असताना डॉ. स्मिता यांनी खारीचा वाटा उचलत लहान-सहान नोकरीचा मार्ग पत्करला. पण, याही परिस्थितीत शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी कायम ठेवली. उत्तम टक्केवारी मिळवत १०वी, १२वी पूर्ण केलं. एमएसडब्ल्यू करत असताना सामुदायिक विकास हा विषय निवडत त्यांनी मेरिटमध्ये स्थान मिळवलं. मराठी साहित्यात एमए करीत असताना त्यांनी अनेक लहान-सहान नोकऱ्या करून आईला हातभार लावला.

आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी वेळेपरी साड्या विकण्याचा व्यवसाय देखील केला. असं म्हणतात की, रात्रीचा काळोख जितका गडद झालेला असतो तितकी पहाट जवळ आलेली असते. डॉ. स्मिता याच्याही आयुष्याची पहाट व्हायला वेळ लागला नाही. जानेवरी 1992 मध्ये लग्न झालं, त्यानंतर लगेच नागपूर आकाशवाणी, अमरावती विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी चालून आल्या. नागपूरला जाण्यासाठी घरच्यांनी केलेला विरोध बघता त्यांनी विद्यापीठातली कनिष्ठ लिपिकाची नोकरी स्वीकारली.

संसाराच्या वेलीवर दोन कन्यारत्नेही फुलली. डॉ. स्मिता आणि पती वसंत यांनी मोठ्या जिद्दीनं मोठ्या वैदेहीला आज इंजिनिअर बनवलंय, तर धाकटी वैष्णवी आर्किटेक्चर करतेय. कुटुंबाची जबाबदारी नेटाने पार पाडत असताना डॉ. स्मिता यांची शिक्षणाची जिद्द मात्र तसूभरही कमी झाली नाही. पीएचडी करून डॉक्टरेट मिळविण्याची कुठेतरी मनात राहिलेली सुप्त इच्छा त्यांनी पूर्ण करण्याचा निश्चय केला.

''जेव्हा एखादे कार्य करण्याचा विचार व्यक्तिच्या मनात येतो, तेव्हा सुरूवातीला त्याचं स्वरूप अमूर्त असतं. पण, या विचाराला जर मनाचे सामर्थ्य, तात्विक अधिष्ठान, प्रेरणा, योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं तर त्याचं मूर्तरूप समोर येतं. वडील वसंतराव उर्फ भय्यासाहेब जोशी यांनी माझ्यात पाहिलेल्या आचार्यकुलांच्या शिलेदारांमध्ये सामील होण्याचं स्वप्न साकार करण्याचा असाच एक विचार माझ्याही मनात आला.'' असं डॉ. स्मिता सांगतात.

''योगायोगाने बंजारा समाजातील्या एका मुलीशी माझी भेट झाली. केवळ तिच्या वेशभूषेवरून आमची ओळख झाली हे विशेष. माझ्याशी बोलताना हळूहळू ती तीचं भावविश्व उलगडत गेली. त्यातून तीच्या समस्या, तिच्या समाजानं नकळत तिच्यावर लादलेल्या रूढी आणि परंपरांची जाणीव व्हायला लागली. मन विषण्ण करणारं तिचं आत्मरूप पाहिलं अन् माझ्या मनाला वाचा फुटली, आणि तीच माझ्या लेखणीतून शोध निबंधाच्या स्वरूपात कागदावर उतरली'', असं डॉ. स्मिता सांगतात.

'बंजारा समाज आणि परिवर्तन - काल आणि आज' या विषयावर शोध निबंध सादर करण्यासाठी त्यांनी अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा हा अवघा पश्चिम विदर्भ पिंजून काढला. बंजारा समाजाचा स्वातंत्रपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यावर त्यांनी आपल्या शोध निबंधात विचार मंथन केलंय. विद्यापीठांच्या इतिहासात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून शोध निबंध सादर करणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला ठरल्या.

“माझा पीएचडीचा अभ्यास सुरू होता, त्या वेळी दोन्ही मुलींचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं. त्या वेळी मुली माझ्या आई झाल्या. अभ्यासासाठी मला वेळ मिळावा याकडे त्यांचं लक्ष असायचं. रात्र रात्र जागून थिसिस लिहायचे त्या वेळी मला रात्री चहाही करून द्यायच्या.” असं डॉ. स्मिता सांगतात. सर्व प्रवासात पदोपदी साथ मिळाली ती माझे पती वसंत साठे यांची, असंही त्या आवर्जून सांगतात.

डॉ. स्मिता यांच्या या जिद्दीमुळे संत गाडगे बाब अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेलाय. विद्यापीठात पार पडलेल्या समारंभात मोठ्या थाटामाटात डॉ. स्मिता यांनी कुलगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यानंतर मार्च 2017 मध्ये डॉ. स्मिता यांच्या आयुष्यात आणखी एक उज्ज्वल पहाट झाली. कुठल्याही कार्याप्रती त्याची जिद्द लक्षात घेऊन विद्यापीठाने त्यांना अधिक्षक या पदावर विराजमान केलं. ''सासर आणि माहेरचे नातेवाईक तर आहेच, शिवाय मित्रमंडळी आणि सहकारीसुद्धा माझी श्रीमंती आहे'', असं मोठ्या अभिमानानं डॉ. स्मिता सांगतात.

डॉ. स्मिता यांचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरी अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेत. या शोधनिबंधांमधून त्यांनी कधी आदिवासी समाजाती स्त्रियांचं भावविश्व उलगडलं, तर कधी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्य भावनांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणावर विशेष मंथन करत त्यांनी आदिवासीच्या प्रथा आणि परंपरांचा उलगडा केलाय. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी गाण्याची आवड जोपासलीय. त्यासाठी त्या दररोज सायंकाळी गायनाच्या क्लासलादेखील जातात. 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या महानाट्यात त्यांनी स्व. इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. तर 'सखी', 'काका किश्याचा' अशा नाटकांमधूनही त्यांनी विशेष भूमिका साकारल्या. अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं. स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये सामाजिक समस्या, प्रसंगचित्रण, व्यक्ती चित्रण आदिवर त्यांनी लेखनही केलंय.

''बुद्धी, शक्ती आणि स्फूर्तीदात्या परमेश्र्वराचं अधिष्ठान असंच कायम राहू दे आणि शोध निबंधातून बंजारा समाजासाठी मांडलेल्या शिफारसींना सकारात्मक चालना मिळूदे'', अशी ईच्छा डॉ. स्मिता यांनी व्याक्त केलीय.

''माझी मला साक्ष आहे मी ग्रंथकर्ता, विद्वान नोहे.. परी ज्ञानराशीत आपुले पोहे टाकावे वाटती..'' राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे विचार आपल्या कार्यातून प्रकट व्हावेत अशी मनिषा बाळगणाऱ्या डॉ. स्मिता तेवढ्याच नित्यनेमाने दरवर्षी आपल्या घरात मनोभावे नवरात्र साजरं करतात. दिवसा 10 ते सायं. 6 ही वेळ ऑफिससाठी राखून ठेवत उर्वरित वेळेत येणाऱ्या नवरात्रीची तयारी करीत आहेत. चित्पावन ब्राह्मणांमध्ये अष्टमीला महालक्ष्मी पूजन ही एक परंपरा आहे. त्यासाठी तांदळाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा तयार करून त्याची स्थापना केली जाते. आणि अष्टमीला घागर फुंकून देवीचा जागर केला जोतो. अमरावतीत डॉ. स्मिता साठे यांच्या कुटुंबियांनी गेल्या 25 वर्षापासून अव्याहतपणे ही परंपरा जोपासलीय. खडे आणून तुळशीची पूजा, तातू बांधून प्रार्थना करायची, देवीची ओटी, आरती, पुरणा-वरणाचा नैवेद्य, तांदूळ आणि खोवल्या नारळाची खीर या सर्व एकत्रित नैवेद्याला 'घावन -घाटलं' असं देखील संबोधतात. अष्टमीला घावन घाटलं घालण्यासाठी डॉ. स्मिता आणि त्यांचं कुटुंब रममाण झालंय. अगदी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत या सर्व गोष्टींची तयारी करण्यात अमरावतीचं साठे कुटुंब अगदी मग्न झालंय. शिक्षणाची आस धरून ती साध्य करणाऱ्या या सामान्यांमधल्या सरस्वतीला सलाम!

 #Durgotsav2018 : '...तरीही शिक्षणाची आस मी सोडली नाही' : एका विद्याव्रतीची कहाणी

First published: October 6, 2018, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading