दुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर

दुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर

दुष्काळामुळे शेती संकटात असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. कोणत्या भागात होतोय टँकरने पाणीपुरवठा?

 • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 16 ऑक्टोबर : पावसाळा संपत आला तरी महाराष्ट्रातील अनेक तालुके अजूनही कोरडेच आहेत. त्यामुळे राज्यातील 202 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट पसरलं आहे.  मराठवाडा आणि खानदेशात तीव्र पाणीटंचाईमुळे 300 पेक्षा जास्त टँकर्सने पाणीपुरवठा केला जातोय. तर राज्यभरातील साडेआठशे गाव-खेड्यांमध्ये टँकरशिवाय पर्याय उरला नाही.

कुठे किती पाऊस झाला?

यंदा राज्यात सरासरी 75 टक्के पाऊस झाला आहे. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरीही बहुतांश भागांत पाऊस रुसलेलाच पाहायला मिळाला.

 • सोलापूर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस
 • 13 जिल्ह्यांत 50 टक्के ते 75 टक्के पाऊस
 • 26 तालुक्यांत फक्त 25 टक्के पाऊस
 • 139 तालुक्यांत 50 टक्के पाऊस
 • 123 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती

दुष्काळामुळे शेती संकटात, उत्पादन घटणार

भात, मका, नाचणी, ज्वारी, सोयाबीन ही पिकं ऐन भरात असताना पाण्याचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे यावेळी राज्यात शेतमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, कापसाचं पीक फुल आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे, पण पाणी नाही. मागच्या वर्षी बोंडअळीच्या रोगाने कापसाच्या पिकावर मोठा परिणाम झाला होता आणि यंदा पावसाअभावी हे पीक हातचं जाणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

कोणत्या भागात होतोय टँकरने पाणीपुरवठा?

 • 342 गावं आणि 498 वस्त्यांमध्ये पाणीटंचाई
 • एकूण टँकर - 354
 • मराठवाडा - 198 टँकर
 • खानदेश - 125 टँकर
 • कोकण - 53 टँकर
 • नागपूर विभागात एकही टँकर लावण्यात आला नाही.

औरंगाबाद , नाशिक, जालना, अहमदनगर, जळगाव, जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे.  दरम्यान, गेल्यावर्षी राज्यात केवळ 98 टँकर्सची आवश्यकता भासली होती.

First published: October 16, 2018, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading