25 फेब्रुवारी : श्रीदेवी यांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसलाय. न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी श्रीदेवी यांना श्रद्धाजंली अर्पण केलीय.
श्रीदेवीचं निधन झालं आणि अनेकांना धक्का बसला. सामाजिक माध्यमातून तो दु:खावेग ओसंडून वाहतोय. सहाजिकच आहे. दक्षिणेतून येऊन बॉलिवूडमध्ये टॉपला गेलेल्या वैजंतीयमाला, रेखा, हेमा मालिनी या मालिकेतलं हे झळाळतं नावं होतं.
मुळातच बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींची कारकिर्द खूप मर्यादित असते. त्यांच्यासाठी म्हणून असे चित्रपट फार अभावाने लिहिले जातात. तरीदेखील मिळेल त्या रोलचं श्रीदेवी यांनी सोनं केलं म्हणूनच त्यांचं हे अकाली जाणं चटका लावतंय. आज तिच्या श्रद्धांजलीत सगळे शोकमग्न असताना हे का घडलं असावं ? याचा विचार व्हायला हवा.
आमचा प्रेक्षक, समाज चित्रपट तारकांना केवळ तरुण, सुंदर, गोऱ्या असंच सदैव पाहू इच्छितो. पन्नाशीपुढची अभिनेत्री ही पंचवीशीतलीच दिसली पाहिजे हीच आमची अपेक्षा ! म्हणून मग निसर्गनियमांच्याविरुद्धच्या शस्त्रक्रिया, वजन नियंत्रित ठेवण्याकरता अनैसर्गिक आहार-विहार, चेहरा तरुण, तजेलदार आणि त्याच्यातल्या सुरकुत्या दिसू नयेत म्हणून केलेले नानाविध उपचार, तीव्र स्पर्धा, कमालीची असुरक्षितता, सातत्यानं लाईमलाईटमध्येच असावं म्हणून केलेली धडपड, 'मी देखील आहे' हे सतत समोर ठेवण्याकरता केलेला खटाटोप या सगळ्याचा तर हा परिणाम नाही ना ?
आम्हाला काय आवडायचं ? तिच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा बोलका अभिनय की केवळ तिचं सुंदर दिसणं. श्रीदेवीचं जाणं ही तिच्या कुटुंबीयांपेक्षा या अपेक्षांची तर शोकांतिका नाही ना ! आजच्या तरुण अभिनेत्रींसाठी तिचा अभिनय हा जसा वस्तुपाठ आहे त्याहीपेक्षा तिचं जाणं हे अधिक विचार करायला लावणारं आहे.