Home /News /special-story /

त्यांनी कर्णबधिरांना बोलतं केलं!

त्यांनी कर्णबधिरांना बोलतं केलं!

जन्मजात ऐकू येत नसलेल्या मुलांनाही योग्य प्रशिक्षण दिलं तर ती व्यक्ती बोलू शकते. हे अकोल्याच्या सुचिता बनसोड यांनी सिद्ध केलंय.

कुंदन जाधव, अकोला, 28 जून : बऱ्याचदा एखाद्याला जन्मजात ऐकता येत नसेल तर ती व्यक्ती बोलूही शकत नाही. कारण त्यांनी कधी शब्दच ऐकलेले नसल्यानं त्यांना शब्दांची ओळख नसते. त्यामुळे सर्रास अशा मुलांना मूकबधीर म्हटलं जातं. मात्र जन्मजात ऐकू येत नसलेल्या मुलांनाही योग्य प्रशिक्षण दिलं तर ती व्यक्ती बोलू शकते.  हे अकोल्याच्या सुचिता बनसोड यांनी सिद्ध केलंय. सुचिता बनसोड यांनी एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेंतर्गत अकोल्यामध्ये बालविकास केंद्र स्थापन केलं.  जिथं फक्त ऐकू येत नसलेली मुलं-मुली येतात. जी वयाने सुद्धा लहान आहेत. २००७ पासून त्या अशा विशेष मुलांना प्रशिक्षित करतायत. त्यांना बोलायला शिकवतायत. फक्त श्रवणशक्तीच्या आधारावर मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. यात श्रवणभाषा प्रशिक्षण, ऑडिटरी व्हर्बल थेरपी म्हणजे त्यांना ऐकून बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. यासोबतच योगा, संगीत, गायन सारखं प्रशिक्षण दिलं जातं. सुचिताताईंना 1998 मध्ये मुलगा झाला. त्याला जन्मताच ऐकू येत नव्हतं. त्याच्यावर वेगवेगळे उपचार सुरू होते. हे सगळे उपचार खर्चिक होते. मात्र त्याच वेळेला सुचिता अस्वस्थ होत्या. कारण आपण  एवढे महागडे उपचार घेतले मात्र सर्वसामान्यांवर जर अशी परिस्थिती आली तर ? या विचारातूनच सुचिता यांनी बीएड इन स्पेशल एज्युकेशन कर्णबधिरांसंबंधी विशेष प्रशिक्षण घेतलं आणि ही शाळा सुरू केली. सुचिताताईंनी सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेली ही शाळा अशीच चिमुकल्यांच्या हसण्यानं फुलत राहू दे. एवढ्याच मनापासून सदिच्छा.
First published:

Tags: Deaf and dum, Education, Suchita bansode, कर्णबधीर, प्रशिक्षण, मूकबधीर, सुचिता बनसोडे

पुढील बातम्या