• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • मुलांच्या आत्महत्या आणि 'ब्लू व्हेल'चा धसका

मुलांच्या आत्महत्या आणि 'ब्लू व्हेल'चा धसका

महाराष्ट्रात गेल्या 20 दिवसांत झालेल्या लहान मुलांच्या आत्महत्या सरळसरळ ब्लू व्हेलशी जोडणं हे त्यांच्या आत्महत्यांच्या मूळ कारणांपासून दूर जाणं आहे. ही मुलं आत्महत्या का करतायेत, नक्की कुठं बिनसलंय याचा वेगळ्या अंगानेही शोध घेण्याची गरज आहे. नाहीतर ब्लू व्हेलच्या आडून चिमुरड्यांच्या आत्महत्या सुरूच राहतील आणि कोणीच त्याकडे वेळीच लक्षं देणार नाही.

  • Share this:
रोहिनी गोसावी, प्रतिनिधी ब्लू व्हेल गेमवर बंदी आणावी, त्याच्या सर्व लिंक ब्लॉक कराव्यात असा आदेश केद्र सरकारनं दिलाय. कारण या ब्लू व्हेलमुळं लहान मुलांच्या आत्महत्यांना सुरुवात झाली. याची सुरुवात मुंबईतून झाली. 14 वर्षाच्या मनप्रित सिंगनं आत्महत्या केल्यानंतर ब्लू व्हेल बद्दल चर्चा सुरु झाली. मनप्रित सिंगची आत्महत्या ही या जीवघेण्या गेममुळेच झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानं त्याच्या मित्रांनाही सांगितलं होतं की मी मोठ्या सुट्टीवर जातोय. म्हणजेच त्यानं आत्महत्या करण्याचं आधीच ठरवलेलं होतं. पण गेमच्या नियमांनुसार आपल्या मास्टरनं आपल्या मारणाची तारीख आधीच ठरवलेली असते. त्यानुसार कदाचित मनप्रित सिंगलाही त्याचं शेवटचं टास्क आधीच देण्यात आलं असेल. म्हणूनच मित्रानं भेटायला बोलावल्यावर आता माझ्या अंत्यविधीलाच तुम्ही या असं त्यानं सांगितलं होतं. पोलिस तपासात मनप्रितच्या मोबाईलमध्ये ब्लू व्हेल पोलिसांना मिळाला नाही. तो मोबाईलपेक्षा प्ले स्टेशनवरच जास्त गेम खेळायचा असं त्याच्या कुटूंबियांचं म्हणणं आहे. पोलिसांनी त्याचा लॅपटॉपही तपासला त्यातही त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळं तो नक्की ब्लू व्हेल गेम खेळायचा की नाही... त्यानं ब्लू व्हेलच्या नादातच आत्महत्या केली, हे सांगणारा एकही ठोस पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाहीये. पण ही घटना इथंच संपली असंही नाही. मनप्रितनं आत्महत्या का केली हे अजूनही कुणी जाणून घेतलेलं नाही. पोलिसांनी तर अपघाती मृत्यूची नोंद करुन प्रकरणच संपवलं. मनप्रितच्या आत्महत्येनंतर ब्लू व्हेल गेमचं महाराष्ट्रभरात लोन पसरलं. अचानक अनेक लहान मुलं या गेममुळं आत्महत्या करायला लागले. त्यांचा वयोगट आहे 10 ते 16 वर्ष. या मुलांनी आत्महत्या केली, त्यांची कारणं काहीही असू शकतात, पण या आत्महत्यांना सर्रासपणे ब्लू व्हेलशी जोडणं कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा, कारण एका मुलाच्या आत्महत्येनंतर अचानक ब्लू व्हेलमुळं मुलं आत्महत्या कशी करायला लागली ? असा साहजिक प्रश्न पडतो. 31 जुलैला मनप्रित सिंगनं आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर लगेच महाराष्ट्रभरात मुलांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. म्हणजे ही सर्व मुलं एकदमच ब्लू व्हेल गेम खेळायला लागली होती का? कारण मनप्रितच्या आत्महत्येनंतर जर हे लोन पसरलं म्हणायचं असेल तर पुढच्या मुलाची आत्महत्या किमान 50 दिवसांनी व्हायला हवी होती. पण मनप्रितच्या आत्महत्येनंतर आठ दिवसांनंतर लगेचच आत्महत्यांना सुरुवात झाली. आत्महत्या हे या गेमचं शेवटचं टास्क आहे. त्याआधी गेम खेळणाऱ्याला 49 टास्क पूर्ण करावे लागतात. गेमचा मास्टर रोज गेम खेळणाऱ्याला एक टास्क देतो. हे सगळे टास्क स्वत:ला इजा करुन घेण्यासारखे आणि खेळणाऱ्याला नैराश्यात घेऊन जाणारे आहेत. ब्लू व्हेल गेम एकांतात खेळला जात असला तरीही त्याच्या टास्कचा होणारा परिणाम हा खेळणाऱ्यावर जाणवणारा आहे. या गेममध्ये आपल्या शरीरावर वारंवार जखमा करुन घेण्याचे टास्क असतात. आपल्या शरीरावर ब्लू व्हेल कोरुन घ्यायचा असतो. पहाटे उठून एखाद्या ब्रिजवर जाऊन उभं रहायचं असतं, घराच्या टेरेसवर जाऊन उभं रहायचं असतं. दिवस दिवसभर कुणाशीही बोलायचं नसतं. सर्वात महत्वाची आणि बेसिक गोष्ट म्हणजे हा मेग साध्या डोळ्यांनी खेळताही येत नाही. हा गेम खेळायला व्हर्च्यूअल रिअॅलिटी डिव्हाईसची गरज असते. तरच तुम्ही हा गेम खेळू शकता. आत्महत्या केलेल्या या मुलांपैकी कुणाकडेही हे डिव्हाईस मिळालेलं नाही. किंवा यातल्या कुणालाही घरातल्यांनी किंवा मित्रांनी असं विचित्र वागताना बघितलेलं नाही. यातल्या कुणाच्याही शरीरावर ब्लू व्हेल कोरलेला किंवा स्वत:ला जखमी करुन घेतल्याच्या खुणा आढळल्या नाहीत. या गेममध्ये आधीचं टास्क पूर्ण करुन तुमच्या मास्टरला त्याचा पुरावा दिल्याशिवाय तुम्हाला पुढचं टास्कच मिळत नाही. त्यामुळं मधले टास्क न करता एकदम आदत्महत्येचं टास्क या मुलांनी पूर्ण केलं असेल असं म्हणणंही चुकीचं ठरतं. ब्लू व्हेल गेममुळं जगभरात 100 हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्यात, त्यामुळं या गेमवर बंदी आणणं योग्यच आहे. मुलांनी केलेल्या आत्महत्या निश्चितच वेदनादायी आहेत. पण त्याचं कारण सरसकट ब्लू व्हेल आहे असं म्हणणंही तितकंसं योग्य नाहीये. मुलांचं मोबाईलवर गेम खेळण्याचं प्रमाण वाढलंय हे जरी खरं असलं तरीही या आत्महत्यांच्या मागचं खरं कारण शोधण्याचीही नक्कीच गरज आहे. ब्लू व्हेल गेम हे साधं सरळ कारण देऊन कोवळ्या वयाच्या मुलांच्या आत्महत्यांकडे डोळेझाक करणं चुकीचं होईल. ब्लू व्हेल गेम हा मुलांना नैराश्याकडे घेऊन जाणारा आहे. पृथ्वीवरचा जैविक कचरा साफ करण्यासाठी मी हा गेम बनवलाय असं तो गेम बनवणाऱ्याचं म्हणणं आहे. म्हणजेच एक प्रकारच्या विकृतीतून तयार करण्यात आलेला गेम आहे जो मुलांना आपलं आयुष्य संपवायला भाग पाडतो. पण अलिकडे महाराष्ट्रात गेल्या 20 दिवसांत झालेल्या लहान मुलांच्या आत्महत्या सरळसरळ ब्लू व्हेलशी जोडणं हे त्यांच्या आत्महत्यांच्या मूळ कारणांपासून दूर जाणं आहे. ही मुलं आत्महत्या का करतायेत, नक्की कुठं बिनसलंय याचा वेगळ्या अंगानेही शोध घेण्याची गरज आहे. नाहीतर ब्लू व्हेलच्या आडून चिमुरड्यांच्या आत्महत्या सुरूच राहतील आणि कोणीच त्याकडे वेळीच लक्षं देणार नाही.
First published: