News18 Lokmat

ओशोंचं अमेरिकेतलं 'वादळी' आयुष्य आता पडद्यावर

अमेरिकेत 1981 ते 1985 या काळात ओशो कल्टची लाट आली. या लाटेच्या ओढीनं ओशो अमेरिकेत गेले आणि त्यांनी ओरेगॉनमध्ये एका वेगळ्या जगाची निर्मिती केली. अमेरिकेतल्या त्यांच्या या वादळी आयुष्यावर जगप्रसिद्ध 'नेटफ्लिक्स' 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही सहा भागांची मालिका बनवत आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2018 08:44 PM IST

ओशोंचं अमेरिकेतलं 'वादळी' आयुष्य आता पडद्यावर

नवी दिल्ली, ता.16 एप्रिल: ओशोंचे जगभर जसे फॅन फॉलोअर्स आहेत तसेच टीकाकारही. ओशोंचे विचार जेवढे बोल्ड तेवढच त्यांचं जीवनही वादळी होतं. अमेरिकेत 1981 ते 1985 या काळात ओशो कल्टची लाट आली. या लाटेच्या ओढीनं ओशो अमेरिकेत गेले आणि त्यांनी ओरेगॉनमध्ये एका वेगळ्या जगाची निर्मिती केली. त्यावरून अमेरिकेत तुफान आलं त्याचा फटका ओशोंना बसला. अमेरिकेतल्या त्यांच्या या वादळी आयुष्यावर जगप्रसिद्ध 'नेटफ्लिक्स' 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही सहा भागांची मालिका बनवत आहे.

कॅपमॅन आणि मॅक्लिन वे हे दिग्दर्शक बंधू ही मालिका बनवत असून ओशोंची ओरेगॉनमधली वादळी कारकिर्द पडद्यावर येणार आहे. 2004 मध्ये वे बंधूंना ओशोंचं अमेरिकेतलं 300 तासांचं दुर्मिळ फुटेज मिळालं. हे सर्व फुटेज पाहून आणि प्रदीर्घ संशोधन करून हे दिग्दर्शक बंधू 'नेटफ्लिक्स' वर तयार करताहेत.

मुक्त विचार, मुक्त आचार आणि मुक्त संचार, त्याला दिलेली अध्यात्माची जोड ही ओशोंच्या विचारांची ताकद होती. त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमांमध्ये खुलं सहजीवन आणि तेवढच खुलं लैंगिक जिवन असल्यानं जगभरातले लोक त्याकडे आकृष्ट झाले.

विदेशी अनुयायांचा पसारा वाढत असल्यानं ओशोंनी 1981 मध्ये अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या ऑरेगॉन प्रातांत त्यांनी तब्बल 64 हजार एकरवर 'रजनिशपुरम्'ची स्थापना केली. 'रजनिशपुरम्' म्हणजे एक स्वयंपूर्ण नगरच त्यांच्या शिष्यांनी वसवलं होतं. देशोदेशीचे त्यांचे अनुयायी 'रजनिशपुरम्'ला राहायला आले. त्यांनी श्रमदान केलं, सर्व कौशल्य पणाला लावलं आणि ओरेगॉनच्या खडकाळ जमीनीवर नंदनवन उभं राहिलं. सर्व जागेचा त्यांनी कायपालटही केला. छोट्या गॅरेजपासून ते विमानतळापर्यंत आणि हॉस्पिटलपासून ते अत्याधुनिक मॉलपर्यंत सर्व काही त्यांनी 'रजनिशपुरम्' मध्ये उभं केलं. त्यांच्या रोल्स राईस गाड्यांचा ताफा आणि त्याच्या कथा त्या काळात जगभर गाजल्या.

Loading...

 

'रजनिशपुरम्' ही दिसणारी बाजू असली तरी हे नगर उभारताना त्यांनी नियमांची पायमल्ली केली. कायदे पायदळी तुडवल्याचे आरोप होऊ लागले आणि स्थानिक प्रशासन विरूद्ध ओशो असा संघर्ष सुरू झाला. 'रजनिशपुरम्'वर पोलिसांनी छापे घातले. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. ओशोंच्या अनुयायांनी रासायनिक प्रयोगशाळा उभारून काही बॅक्टेरियांची निर्मिती केली होती. त्याचा प्रयोग त्यांनी आश्रमातल्या लोकांवरच केला, त्यात 700 जण आजारी पडले. आश्रमात बेकायदा शस्त्रही सापडली. हे प्रकरण चिघळलं आणि त्यात ओशोंना अटक झाली.

अनेक दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर ओशोंची सुटका झाली आणि त्यांना भारतात पाठवण्यात आलं. आणि अमेरिकेतल्या ओशो पर्वावर पडदा पडला. हा सर्व काळ या मालिकांमध्ये दिसणार असून कधीही बाहेर न आलेली माहिती त्यातून कळणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...