भुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय ?

भुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय ?

भुजबळ यथावकाश या आरोपातून पुन्हा एकदा सहीसलमात सुटतीलही..पण त्यांच्यापुढे लागलेला भ्रष्टाचाराचा डाग मात्र, सहजासहजी नक्कीच पुसला जाणार नाही.

  • Share this:

मुंबई, 04 मे : छगन भुजबळ हे खरंतर एक लढवय्यं आणि उमदं ओबीसी नेतृत्त्वं...पण तेच 'आर्मस्ट्रॉग' भुजबळ भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडल्याने तुरुंगात जावं लागलं. आज भुजबळांची जामिनावर सुटका झाली. पण यापुढचा राजकीय प्रवास कसा राहणार हे पाहण्याजोगं ठरणार आहे.

ओबीसी नेतृत्वं, राष्ट्रवादीची मुलूखमैदानी तोफ,ओबीसींचे स्वयंघोषित तारणहार...अशी नानाविध विशेषणं खरंतर भुजबळांनी स्वत:च्या हिमंतीवर मिळवलीत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही भुजबळांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. नव्हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचीही ते आस बाळगून होते. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत असूनही भुजबळांनी नेहमीच आपली स्वतःची वेगळी ओळख आणि राजकीय महत्व कायम दाखवून दिलं. समता परिषदेच्या माध्यमातून तर भुजबळांनी थेट दिल्लीपर्यंत धडक दिली.

पण, एखादा लोकनेता कालऔघात पैशांच्या मागे धावला की, त्याचं पुढे नेमकं काय होतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे आर्मस्ट्रॉग....छगन भुजबळ....खरंतर तेलगी घोटाळ्यातही छगन भुजबळांचं नाव समोर आलं होतं. याच आरोपापोटी त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री गमवावं लागलं होतं. पण, अटकेची कारवाई टाळण्यात मात्र, ते त्यावेळी यशस्वी झाले होते. या आरोपातून सहिसलामत सुटताच भुजबळ राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आणि त्यांनी पवारांकडून सार्वजनिक बांधकाम खातं पदरात पाडून देखील घेतलं.

भुजबळ कसे अडकले?

सार्वजनिक बांधकाम हे खरं तर फारपूर्वीपासून भ्रष्टाचारासासाठी बदनाम आहे. पण, या खात्याच्या मंत्र्याला अटक होण्याची होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधींची लाच स्वीकारल्यांचा आरोप भुजबळांवर आहे. ही लाच स्वीकारण्यासाठी भुजबळ कुटुंबियांनी चक्क बोगस कंपन्या स्थापन केल्या आणि त्याद्वारे करोडो रुपये हवालामार्फत आपल्या खात्यांवर वळते करून घेतले, असा आरोप ईडीने भुजबळ कुटुंबीयांवर ठेवलाय. याच प्रकरणात भुजबळ चुलता पुतण्यावर ही अटकेची कारवाई झालीये.

भुजबळांना अटक आणि मोर्चे

भुजबळांच्या अटकेनंतर अपेक्षेप्रमाणेत त्यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात हिंसक पडसाद उमटलेत. जाळपोळ, रास्तारोको ही आंदोलनं देखील सुरू झालीत. नेहमीप्रमाणेच ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा डाव, अशा स्वरूपाचा कांगावा भुजबळ समर्थकांकडून झाला. भुजबळांच्या अटकेच्या विरोधात येवल्यात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे इतर नेते सहभागी होती. मध्यंतरी भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांनी भुजबळांची रुग्णालयात भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. प्रकाश आंबडेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी तर भुजबळांवर अन्याय होतो अशी जाहीर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाहीतर मागील महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहतील असा इशारा दिला होता.

भुजबळांपुढील आव्हानं

भुजबळ यथावकाश या आरोपातून पुन्हा एकदा सहीसलमात सुटतीलही..पण त्यांच्यापुढे लागलेला भ्रष्टाचाराचा डाग मात्र, सहजासहजी नक्कीच पुसला जाणार नाही. 2019 ची निवडणूक पाहता राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलीये. खुद्द शरद पवार पंतप्रधानपदाची आशा बाळगून तिसऱ्या आघाडीची मोट बांधत आहे. राज्यातही राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा काढून ठिकठिकाणी जागर केलाय. प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील नव्यानेच नियुक्त झाले आहे. पाच वर्ष सत्तेपासून दूर राहणं हे कोणत्याही पक्षाला सहन न होणार आहे.

म्हणूनच राष्ट्रवादीने ओबीसी गटाला जास्त काळ नाराज ठेवणं आपल्याला जड जाईल हे लक्षात घेऊन भुजबळांचा वापर आता खऱ्या अर्थाने करता येईल. पण भुजबळांना पक्षांअंतर्गत जयंत पाटील, अजित पवार सारखी तगडी आव्हानं आहे. अजित पवार हे राज्याचं नेतृत्त्व करतील असं खुद्द सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ते नाकारणं सुनील तटकरेंना किती महागात पडलं हे प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवरून दिसून आलं. त्यामुळेच मागील चुका टाळत भुजबळांना आता पक्षात कसं स्थान मिळतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published: May 4, 2018, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading