विजय देसाई आणि मंगेश चिवटे, मुंबई
13 जुलै : वडिलांनी दिलेल्या कृत्रीम श्वासोच्छवासामुळे एका दीड महिन्यांच्या बाळाचा जीव वाचलाय. या घटनेच्या निमित्तानं सीपीआर म्हणजे कृत्रीम श्वासोच्छवासाबाबत जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
वडिलांच्या मांडीवर असलेला हा प्रीओम....या प्रीओमनं मृत्यूलाही हुलकावणी दिलीये. प्रीओमचा पुन:जन्म झालाय. प्रीओमसाठी त्याचे वडील गुड्डू चौधरीच देवदूत बनून आलेत. गुड्डू चौधरींनी प्रीओमची तब्येत अतिशय नाजूक असताना त्याला सीपीआर दिल्यानं त्याचे प्राण वाचलेत. भाईंदरच्या जय अंबे नगरमध्ये राहणारा प्रीओम महिन्याचा असताना त्याला ताप आला. स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतरही त्याचा ताप उतरला नाही. त्याची प्रकृती आणखीनंच खालावल्यानं डॉक्टरांनी त्याला वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितलं.
भाईंदरहून खासगी गाडीतून प्रीओमला हॉस्पिटलमध्ये चालवलं होतं. यावेळी त्याची प्रकृती जास्तच खालावली. प्रीओमला श्वास घेण्यात अडचण असल्याचं दिसताच गुड्डू यांनी तातडीनं त्याला सीपीआर दिला.
अत्यवस्थ असलेल्या प्रीओमची हालचाल होत नव्हती. एक तासाच्या प्रवासात गुड्डू यांनी त्याला दोन वेळा तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा त्याला सीपीआर मिळाल्यानं हॉस्पिटलपर्यंत प्रीओमच्या ह्रदयाचं धडधड सुरू राहिली.
वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रीओमच्या ह्रदयात ट्युमर असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले. पण गुड्डू चौधरींनी दिलेल्या सीपीआरमुळेच प्रीओम आज या जगात असल्याचं डॉक्टर सांगतात. सीपीआरबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी अशी असं डॉक्टरांना वाटतं.
गुड्डू चौधरींनी दाखवलेली समयसूचकता आणि एका बापाच्या धडपडीमुळे प्रीओमला नवा जन्म मिळालाय. मुलासाठी जिवाचं रान करणाऱ्या या बाबाला सलाम...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा