मुंबई वगळता राज्यभरात ठिकठिकाणी एटीएममध्ये खडखडाट

मुंबई वगळता राज्यभरात ठिकठिकाणी एटीएममध्ये खडखडाट

पुणे, नाशिक, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात नोटांचा तुटवडा निर्माण झालाय.

  • Share this:

 मुंबई, 18 एप्रिल : मंगळवारी उत्तर भारतातल्या राज्यातली जनता एटीएमच्या बाहेर रांगेत उभी होती. तर आज मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातल्या एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळतोय. पुणे, नाशिक, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात नोटांचा तुटवडा निर्माण झालाय.

पुण्यामधले बहुतांश एटीएम कॅशलेस झालेत. रोख रक्कम काढण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून एटीएम सेंटर गाठायला सुरूवात केली. मात्र अनेक एटीएम सेंटरबाहेर नो कॅशचे बोर्ड लागलेला पाहायला मिळाले.

नाशिकमध्ये देखील काही वेगळं चित्र नव्हतं. कॅश काढण्यासाठी नाशिककरांना चांगलीच पायपीट करावी लागत होती. मात्र सर्वात मोठा फटका विदर्भातल्या जिल्ह्यांना बसलेला दिसतोय.

विदर्भातही एटीएमबाहेर रांगाच रांगा

चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमधील एटीएममध्ये कॅशचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळं भर उन्हात लोकांना पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागताहेत. 8 नोव्हेंबरला नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची आज पुन्हा एकदा आठवण झालीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

वाशिममध्ये मोदींचे मुखवटे घालून एटीएमची पुजा

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखा आंदोलन करण्यात आले.  जिल्ह्यातील सर्व एटीएममध्ये पैसे नसल्याने  नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटी घालून शेत मालाची हार तयार करून एटीएमची पूजापाठ करून आंदोलन करण्यात आली. नोट बंदी करून एटीएममध्ये खडखडाट असून शेतमालाला ही भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे प्रतिकात्मक आंदोलन केलं.

बुलडाण्यात एटीएमबाहेर गर्दीच गर्दी

बुलडाणा जिल्ह्यातही बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांचा मोठा हिरमोड होत आहे. राष्ट्रीयकृत बँका असोत वा खाजगी सर्वच बँकांच्या एटीएमची परिस्थिती सारखीच असल्याने एखाद्या एटीएममध्ये पैसे असल्यास त्यासमोर मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये फक्त 20 आणि 50 च्या नोटांची छपाई

सध्या एटीएममध्ये प्रामुख्यानं 2000 आणि 500 रुपयांचा तुटवडा जाणवतोय. नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून फक्त 50 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू आहे. दरम्यान नाशिक करन्सी प्रेसमध्ये सर्व प्रकारच्या नोटांची छपाई करण्याची क्षमता असताना 50 आणि 20 रूपयांच्या नोटा का छापल्या जाताहेत असा सवाल विचारला जातोय.

First published: April 18, 2018, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading