सावरकर ते पुरणपोळी : अटलजींचं महाराष्ट्राशी असं होतं नातं

सावरकर ते पुरणपोळी : अटलजींचं महाराष्ट्राशी असं होतं नातं

स्वातंत्र्यवीर सावरकर हा अटल बिहारी वाजपेयी, सुधीर फडके आणि पुलं देशपांडे यांना जोडणारा समान दुवा.

  • Share this:

पुणे, 16 ऑगस्ट : स्वातंत्र्यवीर सावरकर हा अटल बिहारी वाजपेयी, सुधीर फडके आणि पुलं देशपांडे यांना जोडणारा समान दुवा. अंदाजे 1986-87 चं वर्ष असावं. पुण्यात बिंदु माधव जोशी यांनी सावरकर महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात अटलजींचं मुख्य भाषण होतं. व्यासपीठावर सुधीर फडके, पु. ल. देशपांडे होते. सर्वांनीच अटलजींचं तोंडभरून कौतुक केलं. शेवटी अटलबिहारी वाजपेयी बोलायला उभे राहिले. सुरुवातीलाच त्यांनी त्यांच्यासाठी अतिथी हा शब्द वापरण्यास आक्षेप घेतला. पुण्यात एवढ्या वेळा आलोय की आता पाहुणा राहिलो नाही. मी तुमच्यातलाच आहे असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि पहिल्याच वाक्यात त्यांनी सभा जिंकली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी अटलजींची ही आठवण खास 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना सांगितली आणि अटलजींचं मराठीशी आणि महाराष्ट्राशी असलेलं नातं उलगडून दाखवलं.

वाजपेयींना मराठी उत्तम कळत असे. ते मराठी बोलतही असत. वाजपेयी कवी आणि लेखक असल्याने त्यांना मराठी साहित्य आणि लेखकांबद्दल अतिशय आदर होता. वाजपेयी पुण्यात आले की हमखास मराठी नाटकं बघायला जात. ज्येष्ठ गायक सुधीर फडके विख्यात साहित्यिक पुलं देशपांडे यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. स्वातंत्रवीर सावकर हा या तीघांना जोडणारा समान दुवा होता. सावरकरांच्या काही मराठी कवितांचा वाजपेयींनी हिंदीत अनुवाद केला होता त्याची आठवणही वाजपेयींनी त्या कार्यक्रमात सांगितल्याचं दातार यांनी सांगितलं.

सावरकर म्हणजे 'तीखापन' , सावकर म्हणजे 'तेज'. मराठी माणसांना तिखटपणाबद्दल फारसं सांगावं लागत नाही असंही वाजपेयींनी आपल्या भाषणात सांगितलं. ग्वाल्हेरचा असल्यानं मराठीशी परिचय झाला. तिथल्या मराठीचा एक वेगळाच बाज आहे. 'वरचा मजला खाली आहे' असं ग्वाल्हेरमध्ये म्हटलं जातं. असं सांगत त्यांनी मराठी भाषा कशी व्दिअर्थी आहे हे उलगडून दाखवलं.

पु ल. देशपांडे हे मोठे साहित्यिक आहेत. त्यांचं भाषण ऐकायचं होतं त्यामुळेही मी पुण्यात आलो असं वाजपेयी म्हणाले. पुलं दिल्लीत असताना त्यांची भेट व्हायची. त्यांनी दिल्ली सोडल्याने दिल्लीतल्या साहित्यिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे. पुलं सारखे साहित्यिक मिळणं हे भाग्याचं आहे असं सांगत त्यांनी पुलंच मनापासून कौतुक केलं.

गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमातही वाजपेयी पुण्यात आवर्जुन आले होते. एकदा पंडित भीमसेन जोशी यांनी वाजपेयींसाठी खास कार्यक्रमही केला. त्यांना शास्त्रीय संगीताचीही आवड होती. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांची गाणीही त्यांना खूप आवडायची. त्याचबरोबर मराठी जेवण त्यांना आवडत असे. पुरणपोळी आणि आमरस हे त्यांचे खास आवडीचे पदार्थ होते.

भगवान दातार हे त्या काळात औरंगाबादमध्ये वृत्तपत्रात होते. पण अटलजींच्या प्रेमापोटी ते 500 रूपये खर्च करून पुण्यात येत आणि त्यांची भाषणं ऐकत. त्या काळात पुण्यात झालेली अटलजींची अनेक भाषणं दातारांनी कॅसेटवर रेकॉर्ड केली आहेत. तो संग्रह आज त्यांना वाजपेयींची आठवण करून देतोय.

 

 

पुण्यातल्या सावरकर महोत्सवातलं हेच ते अटल बिहारी वाजपेयींच गाजलेलं भाषण

First published: August 16, 2018, 7:32 PM IST

ताज्या बातम्या