गांधी विचारांच्या परीक्षेत अरुण गवळी टाॅपर !

गांधी विचारांच्या परीक्षेत अरुण गवळी टाॅपर !

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत अरुण गवळीने सर्वाधिक गूण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी, नागपूर, 13 आॅगस्ट : अभिनेता संजय दत्तला ज्या प्रकारे 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये महात्मा गांधी दिसत होते तसाच प्रकार कुख्यात अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळीसोबत घडला की काय अशी शंका निर्माण झालीये. कारण नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत अरुण गवळीने सर्वाधिक गूण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला. अंडरवर्ल्ड डाॅन डॅडी प्रमाणेच अनेक कुख्यात गुन्हेगार आणि जेलमधून फरार झालेले कैदीही परीक्षा उर्तीण झाले आहेत हे विशेष.

'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या अरुण गवळीवर सध्या गांधीगिरीचा प्रभाव झाल्याचे दिसतोय. मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर यांच्या माध्यमातून 80 गुणांची गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. यावर्षीही या परीक्षेत 160 कैद्यांनी सहभाग घेतला. नागपूरच्या कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत ‘डॉन’ अरुण गवळीने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.

गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत, याच विचारांची भीती इंग्रजांनाही होती. अरुण गवळी याचे व्यक्तिमत्त्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, यातून दहशत निर्माण केली होती. आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचाराशी जुळला आहे.

३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मोक्काचे पाच कुख्यात कैदी कारागृह सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. या कैद्यांनी तेव्हा अख्खी पोलीस यंत्रणा हादरवून सोडली होती. हे कैदी सध्या नागपूर कारागृहात आहेत. त्यांनीही गांधी विचाराची परीक्षा दिली होती. तेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत. तर अरुण गवळी हा मुंबईत एका नगरसेवकाच्या हत्याकांडात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे. चित्रपटात गांधी विचारांना आत्मसात करणारा ‘मुन्नाभाई’ बदलला, असाच बदल अरुण गवळीत होणार का हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा

 

First published: August 13, 2018, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading