Home /News /special-story /

EXCLUSIVE अण्णा हजारे : देश बदलण्याची भाषा करणाऱ्या झंझावाताची हवा का कमी झाली?

EXCLUSIVE अण्णा हजारे : देश बदलण्याची भाषा करणाऱ्या झंझावाताची हवा का कमी झाली?

New Delhi: Social activist Anna Hazare addresses a press conference, in New Delhi, Monday, Jan. 21, 2019. (PTI Photo/Ravi Choudhary)  (PTI1_21_2019_000108B)

New Delhi: Social activist Anna Hazare addresses a press conference, in New Delhi, Monday, Jan. 21, 2019. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI1_21_2019_000108B)

अण्णा हजारेंचं आंदोलन खरंच यशस्वी झालं का? एके काळी 'न्यू गांधी' म्हणून गौरवल्या गेलेल्या अण्णांभोवतीची गर्दी कमी का झाली? हे समजून घेण्यासाठी राळेगण सिद्धीला जाऊन अण्णा हजारे हे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न केला.

राळेगण सिद्धी, 13 फेब्रुवारी : एप्रिल 2011 : दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये झालेल्या आंदोलनाने बदलाचं नवं वारं घुमू लागलं होतं. ऑगस्ट 2011 : त्या बदलाच्या वाऱ्याने जनआंदोलनाचं रूप घेतलं आणि सारा देश ढवळून काढला. माध्यमांनी अभूतपूर्व वगैरे असं वर्णन केलेलं जनआंदोलन उभं राहात होतं आणि त्या आंदोलनाचा चेहरा होता गांधीटोपी आणि पांढरा सदरा- धोतर नेसलेला एक सामान्य वृद्ध चेहरा. 'मै हूं अण्णा' लिहिलेल्या टोप्या घातलेले हजारो तरुण रस्त्यावर उतरले. त्या वेळी केंद्र सरकारला हादरा देणाऱ्या या चेहऱ्याने आता 7 वर्षांनी जवळपास त्याच कारणांसाठी पुन्हा तसंच आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत नाही, तर त्यांच्या राळेगण सिद्धीतूनच.  पण या वेळी तथाकथित नॅशनल मीडियानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी 6 तास चर्चा करून अण्णांना मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं आणि अण्णांनी अखेर उपोषण सोडलं. पण या उपोषण आंदोलनाला 7 वर्षांपूर्वीची धार दिसली नाही, क्रांतिकारी बदल आणू पाहणारं हे जनआंदोलन नेमकं कुठे फुटलं? आंदोलनाचा चेहरा झालेल्या अण्णा हजारेंभोवतीची गर्दी गेली कुठे? नेमकं काय झालं त्या 7 वर्षांत? हे समजून घेण्यासाठी राळेगण सिद्धीला जाऊन अण्णा हजारे हे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न केला. लष्करातून गावाकडे किसन बापुराव हजारे उर्फ अण्णा हे महाराष्ट्रासाठी नेहमीच मोठं, आदरानं घेतलं जाणारं नाव. लष्करात ट्रक ड्रायव्हर म्हणून त्यांनी नोकरी केली. सीमावर्ती भागातही त्यांचं पोस्टिंग झालं होतं. तेव्हा देशसेवा करताना शत्रूसेनेचा हल्ल्यातून अगदी थोडक्यात त्यांचा जीव बचावला होता. सेवानिवृत्ती घेऊन ते राळेगण सिद्धीला परतले आणि ग्रामविकासाच्या कार्याला वाहून घेतलं. नगर जिल्ह्यातलं राळेगण सिद्धी पुण्यापासून 90 किमी वर असलेलं छोटं गाव आता देशाच्या नकाशात अण्णा हजारेंचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. "स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाने भारावून जाऊन ग्रामविकासाचा ध्यास तेव्हा मी घेतला होता. गावाचा विकास हाच खरा विकास, ही आजही माझी धारणा आहे," अण्णा सांगतात. गावात पहिल्यांदा त्यांनी केली दारूबंदीसाठी चळवळ. त्यानंतर हाती घेतलेलं मोठं काम जलसंधारणाचं. गावातल्या लोकांना श्रमदानाचं महत्त्व पटवून देत त्यांनी बंधारे बांधून पाणी अडवलं, जिरवलं आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसला. आज संपूर्ण राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतानाही राळेगण सिद्धीला अजूनही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली नाही. "अण्णांमुळे गाव ओळखला जातो. गावात मतभेद असले तरी अण्णांनी हाक दिल्यावर गाव एकमुखाने त्यांच्या मागे उभा राहतो. अण्णांच्या उपोषण आंदोलनाच्या वेळी गावात चुली पेटत नाहीत", सरपंच जयसिंग मापारी सांगतात. गावाकडचा माणूस देशपातळीवर पोहोचला याचा गावाला अभिमान आहेच, पण राजकार अजिबात नको म्हणणाऱ्या अण्णा हजारेंच्या या विचाराशी अनेकांचे मतभेद आहेत. त्याविषयी हलक्या आवाजात कुजबूज गावात सुरू असतेच. अण्णांसाठी जीव ओवाळून टाकणारा गाव अण्णांच्या जवळच्या परिघातल्या कार्यकर्त्यांपैकी एक दत्ता आवारे. ते सांगतात, "अण्णांनी जी आदर्शवादाची शिकवण दिली आहे ती आचरणात आणणारा पुढारी विरळाच. म्हणूनच अण्णा गावाल आजही वंदनीय आहेत. शुद्ध आचार, विचार, त्याग, निष्कलंक जीवन, अपमान पचवण्याची सहनशक्ती या पंचसूत्रीची शिकवण अण्णा देतात आणि स्वतः त्याप्रमाणेच आयुष्य जगतात. तो आदर्श असल्याने गाव आज त्यांच्या पाठिशी उभा राहतो." राळेगण सिद्धी ते रामलीला मैदान 2011 मध्ये झालेल्या अण्णांच्या आंदोलनाने देश व्यापला आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत अण्णांची ख्याती पोहोचली. त्यांना क्रांतिकारी नेतृत्व, भारताला बदलणारा चेहरा अशी विशेषणं मिळाली. BBCच्या मार्क डुमेट यांनी 26 ऑगस्ट 2011च्या त्यांच्या रिपोर्टमध्ये अण्णांना 'नवे महात्मा गांधी' म्हटलं जात असल्याचंही नोंदवलं. महात्मा गांधींशी तुलना झाल्यानंतर सातच वर्षांत आता अण्णांच्या आंदोलनात दम नाही, असं का म्हटलं गेलं? मध्यमवर्गीय शहरी तरुणाईने अण्णांना त्या वेळी दिलेली साथ अचानक का सोडली? अण्णा हजारेंनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्वतः याचं विश्लेषण केलं. "आंदोलनाची गर्दी कमी झाली, हे नाकारता येत नाही. 2011ची टीम अण्णा फुटली हे त्यामागचं कारण. लोकांनी त्या टीमवर विश्वास ठेवला होता. पण कुणाला मुख्यमंत्रिपदाची, कुणाला राज्यपालपदाची स्वप्न पडली ते त्यांच्या वाटेने गेले." अण्णा हजारेंची वाटचाल जवळून पाहणारे आणि 10 वर्षांपासून राळेगण सिद्धीतून त्यांच्याविषयी वृत्तांकन करणारे पत्रकार साहेबराव कोकणे सांगतात, "अण्णा आणि गर्दी हे समीकरण पूर्वीपासून नव्हतंच. 2011 मध्ये अण्णांनी शहरी गर्दी जमवली. त्यामागे होती अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासारखी तगडी टीम. त्यांनी सोशल मीडियाचा आणि मास मीडियाचा चांगला वापर करून अण्णांच्या आंदोलनाचा देशव्यापी प्रसार केला. तशी टीम आताच्या अण्णांच्या आंदोलनामागे अजिबात दिसली नाही." मध्यमवर्ग दुरावला अण्णा हजारेंना मध्यमवर्गाची साथ लाभली ती भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्द्यावर. अरविंद केजरीवाल आणि मंडळींनी हा मुद्दा मोठा करत देश ढवळून काढला आणि त्यांना देशभरातली तरुण शहरी मध्यमवर्गीय मंडळी येऊन मिळाली. पण केजरीवालांचा आम आदमी पक्ष झाला, टीम अण्णा फुटली तशी त्या आंदोलनाची भिंत फुटली आणि मग या मध्यमवर्गाला विश्वास राहिला नाही. अण्णा हजारे ही बाब स्वतः कबूल करतात. राजकारण नको कारण... समाजकारण हेच राजकारणापेक्षा मोठं, हजारे निक्षून सांगतात. "राजकारण करून देश बदलला असता, विकास झाला असता तर आज देशात ही परिस्थीत नसती." सरकारवर जनसत्तेचा अर्थात समाजाचा अंकुश असायला हवा. लोकांनी, लोकांसाठी, लोकांनी मिळून चावलेली लोकशाही अशीच अपेक्षित आहे. म्हणूनच लोकपाल, लोकायुक्त हे कायदे जरुरीचे असल्याचं ते सांगतात. सरकार बदलेल काय? अण्णांच्या पूर्वीच्या आंदोलनांना तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या भाजपने साथ दिली होती. तशी साथ आत्ता काँग्रेसकडून मात्र अण्णांना मिळालेली दिसत नाही. सर्वच पक्षांनी अण्णा हजारेंचा वापर करून घेतला, असं विश्लेषक सांगतात. "ही लोकशाही आहे. आमच्या मंचाचा राजकीय स्वार्थासाठी सगळ्यांनीच वापर करून घेतला. पण मी कधी कुणाला पाठिंबा मागितला नव्हता. कुठला पक्ष मी जवळ केला नाही, आणि कुणावर विनाकारण टीकाही केली नाही", हजारे सांगतात. भाजपने आपला वापर करून घेतला असंही हजारेंनी मागे सांगितलं होतं. आता सरकार बदलणार का आणि नवं सरकार लोकपाल आणि शेतीविषय आश्वासन पाळणार का? असं विचारल्यावर हजारे सांगतात, "सरकार बदलल्याने काय होणार? व्यवस्था बदलायला हवी." मोदी सरकारविषयी... मोदी सरकारविषयी हजारेंचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला. "सरकारला घमेंड आहे. पण जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विरोधक दुर्बळ असल्यामुळे हे होतं. सशक्त लोकशाहीसाठी विरोधकसुद्धा असायलाच हवेत. नाहीतर हुकूमशाहीकडे पावलं वळतात. सध्याच्या परिस्थितीत तोच मोठा धोका आहे." अण्णा हजारेंची खंत गेली 25 वर्षं जवळपास 20 वेळा बेमुदत उपोषणाला बसणारे अण्णा आजही उपोषण अस्त्रात मोठी ताकद असल्याचं मानतात. आपल्यासारख्या फकीर माणसाकडे एवढी जनता कशी गोळा होते, मलाही हे कोडं उलगडलं नाहीये, असं ते सांगतात. 2011 मध्ये देश एका प्रेरणेने प्रभावित झाला होता. आंदोलन उभं राहिलं होतं आणि लोकांचा विश्वास होता. त्याच वेळी टीम अण्णा फुटली. " माझ्याकडे पैसे असते, तर मी सभा घेतल्या असत्या, देशभर फिरलो असतो आणि दुसरी टीम अण्णा उभी केली असती. पण मी फकीर माणूस, मंदिरात राहतो. मी सभा घेऊ शकलो नाही. त्यामुळे आंदोलनावरचा देशाचा विश्वास उडाला. मोठं नुकसान झालं त्या वेळी समाजाचं", अण्णा हजारे ही खंत बोलून दाखवतात. VIDEO : अण्णा हजारेंचा EXCLUSIVE INTERVIEW
First published:

Tags: Anna hazare, Arvind kejriwal, अण्णा हजारे

पुढील बातम्या