अहो,विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का?,'बोचलं म्हणून..' संपूर्ण कविता !

अहो,विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का?,'बोचलं म्हणून..' संपूर्ण कविता !

अहो, 56 इंचच काय माझा बाप 112 इंच फुगवतो...तर तो काय इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो...

  • Share this:

21 सप्टेंबर : 'कवी की कल्पना देखो' असं कुत्सितपणे म्हटलं जात पण कवीच्या तोंडून जेव्हा वास्तवाचे निखारे शब्दांतून कानावर पडतात तेव्हा आपसूक अंगावर शहारे येण्यावाचून राहत नाहीत. अशीच एक कविता सोशल मीडियावर व्हायरल झालीये. ती कविता आहे 'बोचलं म्हणून...'

अंकुश आरेकर असं या तडफदार कवीचं नावं आहे. मूळचा सोलापूर जिल्हयातील मोहोळ तालुक्यातल्या भांबेवाडी गावचा आहे  . अंकुश सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात शिकतो. 12 सप्टेंबरला पिंपरी-चिंचवडमध्ये गदिमांचे वारसदार म्हणून राज्यभरातील सात कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम होता यात अंकुशने 'बोचलं म्हणून...' कविता सादर केली. या कवितेचा जवळपास 5 मिनिटांची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्याची ही कविता जशाच तशी....

बोचलं म्हणून...

लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला याची जीभ रेटतेच कशी...मला तुम्हाला विचारायचं अशा 'दानवां'ना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी ?

काळ्या ढेकळाचं रान...काळ्या डांबरानं माखवलं...आम्ही आडोसा मागत होतो...स्वप्न लवासाचं दाखवलं...आज पोरी बसतात तिथे काल पाखरं बसत होती...अन् पोरांच्या जादूसारखी गोफण फिरत होती...मित्रांनो हे असंच होणार काळी माती झाकली ना तर नाती उघडी पडत जाणार...आहो माणसांचं काय हो... माणसातलं जनावरं चारा खाऊन जगताना पाहिलं...पण अशानं मुकी पाखरं मरत राहणार...

सपत पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा....अन् चटणी भाकरी खातो इथला शेतकरी राजा....अहो चहा नसतोच कपात आमच्या...कोरडा पाव येतो घामाने भिजून हाती....मला विचारायचं फुगवून फुगवून कशी होते छप्पन इंच छाती....

अहो, 56 इंचच काय माझा बाप 112 इंच फुगवतो...तर तो काय इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो...

अहो, बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून...संपत आलेल्या साबनाची चिपळी नव्या साबनाला चिकटवून वापरणारी आपली आईच असते किती साधी...मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी....

अहो, कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का....अहो, विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का...?

पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकण्याचं भांडवलं केलं...पण एकदा सांगा मोदी...तुमच्या चहाच्या टपरीवर कोण-कोण चहा पिलं...

अहो, पोटच्या पोरावर हक्का सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर...यांना कुठे माहीत असतं तेवढ्यासाठी किती भेगा पडल्या माझ्या बापाच्या टाचेवर...

एक्स्प्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतो वाटतो वरून...पण एस्सीतला प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो...पण गरिबी तशीच राहते मागे जनरलचा डब्बा भरून...

अहो, कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा पोलादी छाती मधल्या दमावर...अहो, पावसावर कुणीबी शेती करतो, पण माझा बाप शेती करतो अंगावरच्या घामावर....

आता जगभर प्रवास करा मोदी...पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्याअधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतीकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल...पंतप्रधानपदाचा नाही देणार तुम्ही, पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा  द्यावाच लागेल...

रिकामं पोट आतून भुखेचे डंख मारायलं लागतं...तेव्हा काश्मिरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्न आमच्यासाठी अधिक महत्वाचा वाटतो...तूच सांग भारतमाते यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 08:06 PM IST

ताज्या बातम्या