Home /News /special-story /

गणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'

गणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'

मुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. आज आहे मुंबईचा प्रसिद्ध 'अंधेरीचा राजा'

मुंबईत 1960 च्या दशकात गिरण्याचा खडखडाट होता. लालबाग-परळ हा परिसर म्हणजे गिरणीतल्या कामकारांची मोठी वसाहत. याच कामगारांच्या श्रमाच्या आणि घामाच्या बळावर मुंबईची श्रीमंती वाढली. कोकण आणि इतर भागांमधून मुंबईत भाकरीच्या शोधात आलेल्या माणसांनी येताना त्यांचे सण आणि उत्सवही सोबत आणले. त्यामुळं मुंबईची सांस्कृतिक श्रीमंतीही वाढली. नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे लालबाग-परळमधले कामगार मुंबईत इतरत्रही स्थलांतरीत झालेत. त्यातलं एक ठिकाण म्हणजे अंधेरी. इथल्या गोल्डन टोबॅको कंपनी, टाटा स्पेशल स्टिल आणि एक्सल इंड्स्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यासाठी लालबाग-परळमधून मोठ्या प्रमाणावर कामगार स्थलांतरीत झाले होते. या कामगारांनी 1966 मध्ये आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीची स्थापना केली. या समितीने स्थापन केलेला गणपती म्हणजेच आजचा प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’. या समितीच्या उत्सवाचं हे 53वं वर्ष आहे. चार महिन्यांपासून सुरू होते तयारी पश्चिम उपनगरांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाच्या उत्सवाची तयारी सुरू होते ती चार महिने आधीपासून. गणेशोत्सवाच्या साधारण चार महिने आधी मंडळाची खास बैठक होते. त्या बैठकीत उत्सवाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार होते. दरवर्षी एखाद्या प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती उभारणं ही या मंडळाची खासियत आहे. त्यामुळं यावर्षी कुठलं मंदिर निवडायचं हा त्या बैठकीचा मुख्य अजेंडा असतो. मंडळाची एक समिती त्यावर अनेक महिन्यांपासून काम करत असते. ही समिती या बैठकीत आपला अहवाल सादर करते. कुठलं मंदिर निवडलं पाहिजे, हेच मंदिर का निवडावं? यावर दिर्घ चर्चा होते. सर्वांची मतं घेतली जातात आणि नंतर देखाव्यासाठी एका मंदिराची निवड केली जाते. आणि इतर कार्यक्रमांचा आराखडा तयार करून कामांची वाटणी केली जाते. यानंतर उत्सवाच्या खऱ्या तयारीला सुरूवात होते अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते उदय सॅलियन यांनी दिलीय. थेऊरच्या चिंतामणी मंदिराची प्रतिकृती यावर्षी मंडळ अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या चिंतामणी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. आपल्या वेगळ्या स्थापत्य शैलीसाठी थेऊरचं मंदिर प्रसिद्ध आहे त्यामुळं यावर्षी मंडळानं या मंदिराची निवड केलीय. ज्या मंदिराची निवड केली जाते त्यानंतर मंडळाची एक टिम खास त्या मंदिराला भेट देऊन त्याची प्रत्यक्ष पाहणी आणि अभ्यास करते. नंतर त्या मंदिराची प्रतिकृती तयार झाली की प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाते. गेल्या दोन महिन्यांपासून 40 कलाकार थेऊरच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी झटत आहेत. हे मंदिर पूर्ण झाल्यावर भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं असेल अशी भावनाही उदय सॅलियन यांनी व्यक्त केली. ‘ट्रेडमार्क’ मिळवणारं पहिलच मंडळ आझादनगर सार्वजनिक उत्सव मंडळाने पाच वर्षांपूर्वी अंधेरीच्या राजाच्या नावाच्या आणि मूर्तीच्या स्वामित्व हक्कांसाठी अर्ज केला होता. मंडळाच्या पाच वर्षांच्या पाठपुराव्याला यश आलं असून या वर्षी मंडळाला केंद्र सरकारकडून अंधेरीच्या राजाच्या मूर्तीला आणि नावाला ‘ट्रेडमार्क’ प्रमाणपत्र मिळालं आहे. अशा प्रकारचं प्रमाणपत्र असलेलं हे पहिलच मंडळ असल्याचा दावाही उदय सॅलियन यांनी केलाय. अंधेरीच्या राजाचं प्रस्थ वाढू लागल्याने उपनगरातल्या अनेक मंडळांनी अंधेरीचा राजा हे नाव वापरण्याला आणि मूर्तीची कॉपी करायला सुरूवात केली होती. हे प्रकार वाढत असल्याने मंडळाने ‘ट्रेडमार्क’ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याला यशही आलंय. आता अंधरीचा राजा हे नाव वापरण्याचा आणि राजाची मूर्ती बनवण्याचा अधिकार कुणालाही असणार नाही. मूर्तीसाठी 44 वर्षांची वेटींग लिस्ट अंधेरीच्या राजाची मूर्ती अतिशय आखवी रेखीव आणि देखणी आहे. गेली अनेक दशकं त्यात काहीही बदल झालेला नाही. प्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू ही मूर्ती घडवतात. साडे आठ फुटांची ही मूर्ती असते. भाविक दरवर्षी राजाच्या मूर्तीसाठी देणगी देतात. ही देणगी देण्यासाठी भाविकांचा एवढा प्रतिसाद आहे की मंडळाकडे त्याची प्रतिक्षा यादी तयार झालीय. 2032 पर्यंत मूर्तीचं बुकींग पूर्ण झालंय तर 2062 पर्यंत भाविकांची प्रतिक्षा यादी आहे. यावरून भाविकांच्या प्रेमाची आणि प्रतिसादाची कल्पना येते. बॉलिवूडची मांदियाळी ऐकेकाळी मध्यमवर्गियांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अंधेरीची ओळख आता केव्हाच पुसली गेलीय. अंधेरी आता अतिश्रीमंतांची आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या निवासस्थानांसाठी प्रसिद्ध आहे. जुहूच्या प्रसन्न समुद्र किनाऱ्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड अभिनेते या भागात वास्तव्याला आहेत. नंतर अनेक अलिशान सोसायट्या तयार झाल्या आणि ही संख्या वाढत गेली त्यामुळे चित्रपट कलाकारांची या भागात वर्दळ असते. ही सर्व मंडळी न चुकता अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी येत असते. त्यात अमिताभ बच्चन पासून ते नवख्या कलाकारापंर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. विसर्जनाची अनोखी परंपरा गणेशोत्सव हा गणेशचर्तुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. अनंत चतुर्दशीला सर्वच गणपतींचं विसर्जन होते. मात्र अंधेरीच्या राजाची परंपरा मात्र वेगळी आहे. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टीला राजाचं विसर्जन करण्याची अनोखी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी कामगारांच्या सोयीसाठी असं केलं जात असे नंतर ती पडलेली प्रथा आज तागायत सुरूच आहे. राजाच्या मंडपापासून विसर्जन स्थळाचं अंतर फक्त 4 किलोमिटर आहे मात्र हे अंतर कापायला मिरवणूकीला तब्बल 19 ते 20 तास लागतात. रस्त्यावर प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक घरातून राजाची आरती आणि पूजा केली जाते. राजाला निरोप देण्यासाठी नागरिक परिसर स्वच्छ करतात. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते. दिवे लावले जातात आणि अतिशय प्रसन्न वातावरणात राजाला निरोप दिला जातो. अतिशय भावस्पर्शी ही मिरवणूक असते. या मिरवणूकीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढले जाते. ढोल-ताश्यांच्या गजरात आणि भजन करत ही मिरवणूक निघते. त्यामुळं पावित्र्य आणि परंपरा यांचा सुरेख संगम मंडळाने आपल्या उदाहणातून घालून दिला आहे. आधुनिकता आणि परंपरा यांचा मेळ घालून राजचा हा उत्सव असाल पुढं वाढवत नेण्याचा मंडळाचा निश्चय आहे.
First published:

Tags: गणेशोत्सव, लालबागचा राजा

पुढील बातम्या