दुसऱ्यांदा अमित शहा 'मातोश्री'वर, सेना मागे घेणार स्वबळाचा नारा ?

दुसऱ्यांदा अमित शहा 'मातोश्री'वर, सेना मागे घेणार स्वबळाचा नारा ?

  • Share this:

मुंबई,06 जून :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत. बुधवारीही अतिशय महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीसाठी सेनेचा काहीच अजेंडा नसल्याचं म्हटलं असलं तरी युतीचं बरचसं भवितव्यही हे या बैठकीवरच अवलंबून असणार आहे असं सांगितलं जातंय.

पालघर निवडणुकीत सेना - भाजपने परस्परांना आजमावल्यानंतरही अमित शहा स्वतःहून उद्धव ठाकरेंच्या भेटीला येत आहेत. यातच खरंतर सर्वकाही आलंय. युती केली तरच आगामी निवडणुका जिंकू शकू, हे एव्हाना दोन्ही पक्षांना कळून चुकलंय. पण गेल्या 4 वर्षात भाजपने दिलेली सापत्न भावाची वागणूक सेना काही केल्या विसरायला तयार नाहीये. कदाचित म्हणूनच पालघर निवडणुकीनंतरही उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहेत. पण आता स्वतः अमित शहांनीच पुढाकार घेतल्याने सेनेला युतीबाबत फेरविचार करावा लागणार आहे. पण युतीबाबतचा अंतिम निर्णय हे उद्धव ठाकरेच घेणार असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

अमित शहांनी 'मातोश्री'कडे भेटीची वेळ मागताच सेनेकडून लगेच, आता कसे शरण आले. या तोऱ्यात सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरू केलीय, अर्थात भाजपकडून मात्र, अजून तरी त्याला प्रत्युत्तर दिलं गेलेलं नाहीये. आता आपण युतीसंदर्भात प्रमुख बैठका कधी झाल्या होत्या आणि यापुढे काय होऊ शकते यावर एक नजर टाकुयात....

उद्धव ठाकरे आणि शहा यांची भेट

10 एप्रिल 2017 - दिल्लीत एनडीएची बैठक, उद्धव ठाकरेंची खास उपस्थिती

18 जून 2017 - मातोश्रीवर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात 70 मिनिटे बैठक, राष्ट्रपतीपदासाठी सेनेचा भाजपला पाठिंबा

6 जून 2018 - अमित शहा पुन्हा मातोश्रीवर येणार, युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता

पालघर पोट निवडणुकीत भाजप जिंकली असली तिथं सेनेनं नक्कीच कडवी झुंज दिलीय. अशातच पोटनिवडणुकीतील पराभवाची मालिका आणि कर्नाटकात विरोधकांच्या ऐक्यामुळे आलेलं अपयश भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जातेय. कदाचित म्हणूनच भाजपने दुरावलेल्या मित्रपक्षांना पुन्हा गोंजारायला सुरूवात केलीय.

अमित शहांची 'मातोश्री' भेटही त्याच रणनीतीचा एक मानला जातोय. अर्थात युती होणार की नाही हे या बैठकीतील चर्चेवरच अवलंबून असणार आहे. तसंही सेना नेत्यांचा एक गट किमान लोकसभेसाठी तरी युती करण्याच्या बाजुचा आहे. पाहुयात नेमकं काय होतंय ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 11:17 PM IST

ताज्या बातम्या