• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • सभागृह, अजित पवार आणि प्लास्टिकची अंडी...!

सभागृह, अजित पवार आणि प्लास्टिकची अंडी...!

अजित पवारांनी आज विधानसभेत प्लास्टिकची अंडी दाखवून चांगलीच खळबळ उडवून दिली. यावरच अगदी 'आम्लेट फ्राय' स्टाईल भाष्य करणारं हे छोटेखानी 'स्फूट'

  • Share this:
अद्वैत मेहता, प्रतिनिधी, पुणे पुणे, 4 ऑगस्ट : अजित पवार यांनी आज विधिमंडळामध्ये प्लास्टिकच्या अंड्यांचा विषय काढला ही बातमी कानावर आली आणि सखेद आश्चर्य वाटलं. अजित पवार हे खरंतर अनुभवी आणि जेष्ठ आमदार आहेत शिवाय त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रिपदही भुषवलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार ज्या पश्चिम महाराष्ट्र पट्टयातून येतात त्या भागात कुकूट पालन हा शेतकऱ्यांचा जोड धंदा आहे. प्लास्टिक अंडी हा निव्वळ खोडसाळपणा किंवा अज्ञान आहे, हे विज्ञाननिष्ठ शरद पवार यांच्या राजकीय वारसदाराला माहिती नसावं याचं सखेद आश्चर्य वाटलं. विधीमंडळात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडताना सरकारची 'अंडी पिल्ली' काढणारे हेच ते अजित पवार का हा प्रश्न पडू लागला. कारण 3 महिन्यांपूर्वी NECC अर्थात नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीने पुण्यात प्रात्यक्षिकं दाखवून हवामानाचा, वातावरणातील उष्णतेचा परिणाम होऊन काही ठिकाणी प्लास्टिक सदृश अंडी आढळली हे स्पष्ट केलं होतं. अन्न ,औषध प्रशासनानं प्रयोगशाळेत या कथित प्लास्टिक अंड्यांची चाचणी घेऊनच हा अहवाल दिलाय. थोडक्यात अगदी स्पष्टच शब्दात सांगायचं झालंतर प्लास्टिक अंडी असा काही प्रकारच नाहीये. पण जनतेमध्ये प्लास्टिक अंडी हा विषय अफवेसारखा पसरून शेतकऱ्यांचं लाखो, कोट्यवधीचं नुकसान झालं होतं. आधीच दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी अडचणीत असताना दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन हा जोडधंदा त्याला हात देतो, तेव्हा कुठे बळीराजा तग धरून राहू शकतो, अन्यथा हे प्लास्टिक अंड्याचं खुळ म्हणजे निव्वळ दुष्काळात तेरावा महिना असंच इथं खेदाने नमूद करावं लागेल. पण राजकारणातल्या या 'दादा' व्यक्तिमत्वाने प्लास्टिक अंडी या संपलेल्या विषयाचं थेट विधीमंडळात आपल्याचं अज्ञानाचं एका अर्थाने 'ऑम्लेट फ्राय' करून घेतलं असंच म्हणावं लागेल. म्हणूनच अजित पवार यांच्यासारख्या सतत अपडेट राहणाऱ्या, विज्ञानाबद्दल आदर-आस्था असणाऱ्या जेष्ठ, अनुभवी नेत्यांकडून अंड्यांचं हे असं प्रदर्शन व्हावं, याचं खचितच वाईट वाटतं. वृत्तपत्रं, न्यूज चॅनेल्स बारकाईने पाहणाऱ्या दादांच्या नजरेतून ही 'प्लास्टिक अंडे का फंडा'ची बाब सुटलीच कशी, थोडक्यात 'ये बात हजम नही हुई...!' तेव्हा अजितदादा, संडे असो वा मंडे रोज बिनधास्त खा अंडे, मग ते उकडून, काऑम्लेट का भुर्जी का अंडा करी, बिर्याणी करून...तुमची मर्जी...पण अफवांना मात्र, ही अशी थेट सभागृहात हात उंचावत अंडी दाखवून अकारण खतपाणी घालू नका...कारण तुम्ही विज्ञाननिष्ठ शरद पवारांचा राजकीय वारसा चालवत आहात.
First published: