600 पत्रं, 23 वर्ष आणि न भेटलेली अशीही प्रेमकहाणी !

600 पत्रं, 23 वर्ष आणि न भेटलेली अशीही प्रेमकहाणी !

"असंही एक प्रेम होतं. ज्यात तो तिला एक नाही दोन नाही तर 23 वर्ष भेटलाच नाही त्याने तिला पाहिलंच नाही. तिने त्याच्याशी लग्नही केलं नाही पण त्यांच्या प्रेमाने 'त्याचं' आयुष्यच बदललं एवढंच काय तर त्याच्या मृत्यूच्या तब्बल 30 वर्षांनंतर जगाला त्याच्या या प्रेयसीचा शोध लागला. ही अनोखी लव्ह स्टोरी आहे खलील जिब्रानची..."

  • Share this:

चित्ततोष खांडेकर,प्रतिनिधी 

प्रेमाचे अनेक रंग असतात. शब्दांशिवायही प्रेमात संवाद साधला जातो...प्रेम म्हणजे तळमळणं दुसऱ्याला होणाऱ्या वेदनेनं कळवळणं तेही समोरचा माणूस कोसो मैल..दूर असताना. कुठलीच भेट होत नसताना... पण आजचं प्रेम खूप फास्ट झालंय. व्हाॅट्सअॅप फेसबुकवर 'तो' तिला भेटतो व्हिडिओ कॉल करतो आणि टिंडरवर फक्त एकामेकाचे फोटो स्वाईप केले की जोडीदार मिळतो. झालं! लॉँग डिस्टन्स रिलेशनशिप मधली अंतरं आता तेवढी जाणवत नाही. सोशल मीडियाच्या कृपेने ही अंतरं खूप कमी होऊन गेली आहेत. पण असंही एक प्रेम होतं. ज्यात तो तिला एक नाही दोन नाही तर 23 वर्ष भेटलाच नाही त्याने तिला पाहिलंच नाही. तिने त्याच्याशी लग्नही केलं नाही पण त्यांच्या प्रेमाने 'त्याचं' आयुष्यच बदललं एवढंच काय तर त्याच्या मृत्यूच्या तब्बल 30 वर्षांनंतर जगाला त्याच्या या प्रेयसीचा शोध लागला. ही अनोखी लव्ह स्टोरी आहे खलील जिब्रानची..

आता खलील जिब्रानला कुठल्या ओळखीची गरज नाही. आपल्या कवितांनी सगळ्या युरोपाला या माणसाने भुरळ घातली. 'द प्रोफेट द मॅडमॅन' अशा काव्यसंग्रहातून त्याने लोकांची मन जिंकली. जगातल्या शेकडो भाषांमध्ये त्याच्या कवितांचा अनुवाद झाला.. आजही इंग्रजी साहित्यात त्याचं नाव आदराने घेतलं जातं. पण भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या जिब्रानची मातृभाषा काही इंग्रजी नव्हती. जिब्रान जन्माने अरब होता. तो लेबनान या छोट्याशा देशाचा रहिवासी होता. त्याच्या आईची तीन लग्न झाली होती. त्याची आई त्याची बहिण सुलताना आणि तो असं त्यांचं छोटेखानी कुटुंब प्रचंड गरिबीत खितपत पडलं होतं. लेबनानमधून खलील जिब्रान त्याच्या आई आणि बहिणीसोबत अमेरिकेत बोस्टनमध्ये आला. ऐन उमेदीच्या वयात त्याच्या बहिणीने...सुलतानाने जगाचा निरोप घेतला...नशीब, परिस्थिती, काहीच जिब्रानला साथ देत नव्हतं. पण तरीही जिब्रानने कच खालली नाही. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकण्याची खलीलची तयारी होती. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्याने आपल्या हाताने रंगवलेल्या चित्रांचं प्रदर्शन त्याने बोस्टनमध्ये भरवलं.

 

तिथे ती आली होती...ती 31 वर्षाची तो 21 वर्षांचा होता...ती मुख्याध्यापिका होती..तो विद्यार्थी होता..ती सुखवस्तू होती..तो प्रचंड गरीब होता. त्या दोघांमध्ये समान असं काहीच नव्हतं..पण तरीही ती तिथे त्याला भेटली. त्याच्या चित्रांच्या कलाकारीच्या प्रेमात पडली. तिचं नाव होतं मॅरी एलिझाबेथ हॅसले. तिने जिब्रानमधील चुणूक ओळखली. तिने जिब्रानला पुढे शिकवण्याची तयारी दाखवली. जिब्रानला पॅरीसला जाऊन पेटिंग शिकायचं होतं. मॅरीने सगळा खर्च केला. जिब्रान पॅरीसला गेला...पण त्याचं ह्दय मागे सोडून!

जिब्रान मॅरीला कित्येक वर्ष त्यानंतर भेटलाच नाही! पण ते एकामेकाला जोडले गेले. तेही पत्रांनी.. प्रेम म्हणजे दोन जीव पण एक श्वास ही उक्ती या दोघांनी खरी ठरवली. तब्बल 23 वर्ष जिब्रान आणि मॅरी एकामेकाला पत्र लिहीत होते. 600 हून अधिक पत्र त्यांनी एकमेकाला लिहिली. मॅरी त्याच्या आठवणी आपल्या डायरीत टिपून ठेवायची. तो तिची पत्र आपल्या उशाखाली जपून ठेवायचा..कुणालाही कळू न देता!

भारतीय पुराणांमध्ये नल दमयंतीची प्रेमकथा सांगितली जाते. नल हा अयोध्येचा राजा होता. दमयंती विदर्भाची राजकुमारी होती. या दोघांचंही एकमेकावर आतोनात प्रेम होतं. दमयंती राजहंसाकरवी नलाकडे आपल्या प्रेमाचे संदेश पाठवायची नल आणि दमयंतीही कित्येक वर्ष एकमेकांना काही कारणांनी भेटलेच नाही. पण त्यांच्यां संदेशांनी त्यांना जोडून ठेवलं.

जिब्रान आणि मॅरी हे आधुनिक नल दमयंती वाटतात. जिब्रान तिला पत्रात लिहितो

"मॅरी मी दु:खात असतो,आतून पुरता भंगलेला असतो तेव्हा तू मला लिहिलेली पत्र मी वाचतो. तुझी पत्र मला स्वत:ची आठवण करून देतात. माझ्यातला मीपणा जागृत करतात आणि मी पुन्हा उभारी घेऊन उभा राहतो"

मॅरी जिब्रानच्या आयुष्यातला एक मोठा आधारस्तंभ होता. जिब्रानचं इंग्रजी सुधारायला तिने प्रचंड मदत केली होती. त्याने लिहिलेली प्रत्येक कविता तो पत्रातून पाठवायचा त्या प्रत्येक कवितेत मेरी सुधारणा करायची आणि ती कविता पुन्हा जिब्रानला पाठवायची. जिब्रानचा प्रॉफेट या काव्यसंग्रहात मॅरीने त्याला प्रचंड मदत केली. जिब्रानच्या पत्रांमध्ये त्याचं प्रेम ओथंबून वाहत आहे. तर मॅरीच्या? मॅरीने फक्त पत्रच लिहिली नाहीत तर अवघ्या आयुष्यात त्यांच्या ज्या दोन तीन भेटी झाल्या त्यांची टिपणंही लिहून ठेवली. तिच्या जवळ बसून जिब्रानचं रडणं असेल..तिच्यापासून दूर जाऊन अनेक दिवस न भेटण्याची भावना असेल अशा सगळ्याच आठवणींचा साठा तिने डायरीमध्ये लिहून ठेवली. प्रेमाच्या एका वेगळ्याच जगात जाण्याची स्वप्न ते रंगवतात. मॅरीच्या चार चेहऱ्यांचं चित्र जिब्रानने चित्तारलं

.

 

पण प्रश्न असा पडतो की, इतकं खरं एकामेकाला न पाहता न भेटताही टिकणारं, समुद्राहूनही खोल त्यांचं प्रेम होतं तर त्यांनी लग्न का नाही केलं? ते सोबत का नाही राहिले? या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं ही पत्र देत नाहीत. काही जाणकार म्हणतात, मॅरी त्याच्याहून वयाने दहा वर्ष मोठी असल्याने तिने त्याला लग्न करायला नकार दिला. तर काही जण म्हणतात जिब्रानला एकटं राहायचं होतं. काही जाणकारांच्या मते ते शरीराने एक कधी झालेच नाही! या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. चित्रकार जिब्रानमधला कवी जिब्रान लेखक जिब्रान खरं तर मॅरीने चित्तारला होता. त्याच्यातल्या मीपणच्या जाणिवा तिनेच शोधल्या होत्या. त्याच्या जाणिवांना अर्थ दिले होते नेणिवांना मार्ग दाखवला होता.

पण अशा मॅरीने 1926 साली लग्न केलं. जिब्रानशी नाही...कुणा दुसऱ्य़ाशी! त्यानंतर अवघ्या पाच वर्षात जिब्रानचा मृत्यू झाला. जिब्रान व्यसनाधीन झाला होता. तो दिवसभर स्वत:ला खोलीत बंद करून घ्यायचा. दारूचे घोट पीत पीत दिवस ढकलायचा. वेगवेगळे नशे करायचा... अखेर 1931 मध्ये त्याचा मृत्यू झाला. तो दारूच्या इतक्या आहारी का गेला? याचं कारण मॅरी तर नसेल? अनेक संभावना आहेत, पण उत्तर मिळत नाही! प्रत्येक प्रेम मिलनातच संपतं असं नाही. कारण जिब्रानच्या मृत्यूनंतर विवाहित मॅरी त्याच्या घरी गेली. तिने त्याला लिहिलेली सगळी पत्र आयुष्यभर सांभाळून ठेवली. जिब्रानच्या मृत्यूनंतर तीस वर्षाने...जेव्हा तिचा अंत जवळ आला होता. ही पत्र तिला अनमोल ठेवा वाटला म्हणून मृत्यूआधी ही पत्रं तिने एका ग्रंथालयाला दिली...ती आठ वर्षांनी प्रकाशित झाली.

हे पुस्तक म्हणजे 'बिलव्हेड प्रॉफेट'! हे पुस्तक प्रचंड गाजलं. त्या पुस्तकामुळे ही न भेटलेली प्रेमकथा अजरामर झाली. मॅरीने आधी जिब्रानमधला कवी बाहेर काढला. त्याच्यातला लेखक घडवला. आणि नंतर त्याच्या मनाचा छुपा हळवा कोपराही उघडा केला. जिब्रानमधला प्रियकरही मॅरीमुळेच जगाला कळला.

 

 

 

 

 

 

मेरी आणि जिब्रान आयुष्यभर एकामेकांवर प्रेम करत राहिले. भले ते मूर्त रूपात उतरलं नसेलही. जिब्रानच्या प्रेमाची एकमेव निशाणी म्हणजे फक्त आणि फक्त त्याची पत्रं जी त्यानं मेरीला लिहिली होती... विंदा एका कवितेत लिहितात,

माझे नसून मी द्यावे

तुझे व्हावे दिल्याविण

पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे

जन्म टाकाया गहाण

असंच काहीसं या दोघांचं प्रेम होतं! ज्यात लाँग डिस्टन्समध्येही कुठलाच डिस्टन्स नव्हता!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 06:41 PM IST

ताज्या बातम्या