मुंबई, 24 मार्च: चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराची पूजा करण्याचा प्रघात आहे. मत्स्य अवतार हा दशावतारातील पहिला अवतार आहे. भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत. या रूपात प्रकट होऊन श्री हरीने प्रलयापासून विश्वाचे रक्षण केले आणि वेद पुन: प्राप्त केले होते.
यावर्षी मत्स्य जयंती शुक्रवार, 24 एप्रिल 2023 रोजी येत आहे. या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4.15 पर्यंतचा काळ पूजेसाठी शुभ राहील. मत्स्य जयंतीला भक्तिभावाने पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. मात्र यासोबत मत्स्य जयंतीच्या दिवशी करावयाची काही विशेष कामे सांगितली आहेत. ही कामे केल्याने देवाची भक्तावर विशेष कृपा होते.
भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार का घेतला?
भगवान विष्णूने सर्व अवतार विश्वाच्या कल्याणासाठी घेतले. तसेच माशाच्या रूपात भगवंताचा अवतारही जगाच्या कल्याणासाठीच होता. भगवान विष्णूच्या महाकाय मत्स्यरूपाबद्दलच्या धार्मिक आणि पौराणिक कथेनुसार, प्रलयाच्या संकटापासून विश्वाला वाचवण्यासाठी देवाला माशाचे रूप धारण करावे लागले. या अवतारात देवाने वेदांचेही रक्षण केले. पौराणिक कथेनुसार, कश्यप आणि दिती यांच्या राक्षसी पुत्राने वेद समुद्रात खोल खोलवर लपवले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी माशाचे रूप धारण करून त्याच्याशी युद्ध केले आणि वेद परत मिळवून महर्षी वेद व्यासांच्या स्वाधीन केले.
मत्स्य जयंतीला करा हे काम
मत्स्य जयंतीच्या दिवशी शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच या दिवशी माशांना खाऊ घाला. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. मत्स्य जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालते, भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होतात.
मत्स्य जयंतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी नदीत स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते. जर कोणत्याही कारणाने नदी स्नान शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करता येते.
मत्स्य जयंतीला गरीब, गरजूंना 7 प्रकारच्या धान्यांचे दान करावे. तसेच या दिवशी मंदिरात हरिवंशपुराण दान केल्याने पुण्य मिळते.
मत्स्य जयंतीच्या दिवशी पद्धतशीरपणे देवाची पूजा करा आणि पूजेत भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराशी संबंधित कथा जरूर वाचा. यासोबत मत्स्य जयंतीला 'ओम मत्स्यरूपाय नमः' या मंत्राचा जप करावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra