विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक 2 एप्रिल : श्रीरामनवमी झाल्यानंतर दोन दिवसांनी नाशिक शहरात श्रीराम रथोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे.संपूर्ण नाशिककर या सोहळ्यात उपस्थित असतात. श्रीराम स्वत: या उत्सवात सहभागी असतात अशी सर्वांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक रथोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता असते.
काय आहे परंपरा?
नाशिकमध्ये श्रीरामाचा रथोत्सव मोठ्या आनंदात चैतन्यपर्व म्हणून साजरा केला जातो.चैत्र शुक्ल एकादशीला हा उत्सव असतो. संध्याकाळी 5 च्या दरम्यान या उत्सवाला सुरूवात होते. या उत्सावात दोन रथ सहभागी होतात. त्यामध्ये एक श्रीरामाचा तर दुसरा रथ गरुडाचा मानला जातो. श्रीरामाच्या रथात स्वत: प्रभू श्रीरामचंद्र तर गरुडाच्या रथात श्री हनुमान विराजमान असतात अशी अख्यायिका आहे.
जमलं असलं तर थांबू नका! अधिकमास असला तरी 'या' मुहूर्तांवर उडवू शकता लग्नाचा बार
संपूर्ण नाशिक शहरात ही रथ यात्रा काढली जाते.पुढे श्री हनुमानाचा रथ आणि मागे श्रीरामाचा रथ असतो.ही परंपरा जवळपास 1760 सालापासून सुरू असल्याची माहिती आहे.या रथ उत्सवाचे संपूर्ण नियोजन रास्ते आखाडा तालीम संघाकडे असते. त्याचबरोबर रथाचं नियंत्रण हे दीक्षित कुटुंबाकडे आहे. रथ ओढण्याचा मान रास्ते तालीम संघ,आणि अहील्याराम व्यायाम शाळेच्या बल उपासकांचा आहे. त्यासाठी ते रोज व्यायाम करून तयारी करतात.
रामकुंडावर हा रथ आल्यानंतर गोदावरीच्या पवित्र जलाने श्री राम,आणि श्री हनुमानाला स्नान घातलं जातं. त्यानंतर संपूर्ण शहरात मिरवणूक काढून शेवटी श्री काळाराम मंदिराच्या समोर येऊन महाआरती करून या श्रीराम रथोत्सवाची सांगता होते अशी प्रतिक्रिया धर्मशास्त्र अभ्यासक डॉ.नरेंद्र धारणे यांनी दिली आहे.
हनुमान जयंती आली जवळ, शुभ मुहूर्तावर करा बजरंगबलीची पूजा, कुटुंबाची होईल प्रगती
आज म्हणजेच रविवार 2 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता या रथोत्सवाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहतील. त्याचबरोबर ते रथांवर फुलांचा वर्षावही करतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.