मराठी बातम्या /बातम्या /religion /

मुलं अभ्यासात नाहीत राहणार मागं; वसंत पंचमीला सरस्वती पूजेत या गोष्टी न चुकता करा

मुलं अभ्यासात नाहीत राहणार मागं; वसंत पंचमीला सरस्वती पूजेत या गोष्टी न चुकता करा

वसंत पंचमी पूजा

वसंत पंचमी पूजा

वसंत पंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही देवी सरस्वतीची पूजा करता किंवा अभ्यास करता तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न होईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 26 जानेवारी : यावर्षी वसंत पंचमी 26 जानेवारीला आहे. शैक्षणिक गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. कला आणि संगीतात प्राविण्य प्राप्त व्हावे, म्हणून देवी सरस्वतीने वीणा आणि पुस्तक दोन्ही हातात धरले आहे. या दोन गोष्टी ज्ञान आणि संगीताचे प्रतीक आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही देवी सरस्वतीची पूजा करता किंवा अभ्यास करता तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न होईल. ती प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल, ज्यामुळे शिक्षण, ज्ञान, कला आणि संगीत क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यांच्या आशीर्वादाने यश मिळणे सोपे जाईल.

देवी सरस्वतीला प्रसन्न करण्याचे उपाय

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट म्हणतात की, माता सरस्वती ही वाणी आणि ज्ञानाची प्रमुख देवता आहे. तिची कृपा ज्याला मिळते, त्याला जीवनात अपार यश मिळते. माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकता, त्यासोबत मेहनत करणे देखील आवश्यक आहे.

1. यश मिळण्यासाठी सरस्वती मंत्र -

वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करताना ॐ ऐं सरस्वत्यै ऐं नम: किंवा ऐं महासरस्वत्यै नमः या मंत्राचा जप करावा. कामात यश मिळेल.

2. शिक्षण-स्पर्धेतील यशाचा मंत्र -

माता सरस्वतीचा गायत्री मंत्र ॐ वागदैव्यै च विद्महे कामराजाय धीमहि, तन्नो देवी प्रचोदयात्‌. याचा जप केल्याने शैक्षणिक स्पर्धेत यश मिळते, असे मानले जाते.

3. सरस्वती पूजेच्या दिवशी माता सरस्वतीला पांढर्‍या कमळाचे फूल अर्पण करा. तिला कमळाचे फूल खूप आवडते. त्यामुळे सरस्वती माता प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल.

4. वसंत पंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही माता सरस्वतीची पूजा करता तेव्हा तिच्या चरणी पिवळे चंदन किंवा कुंकू अर्पण करा. पूजेनंतर ते वाहिलेले चंदन-कुंकू सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला कोणतेही विशेष काम करायचे असेल तेव्हा त्याचा टिळा लावा आणि कामाला लागा, तुम्हाला यश मिळेल.

5. जर तुम्हाला शिक्षण, स्पर्धा किंवा करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर तुमचे अभ्यासाचे टेबल अशा प्रकारे ठेवा की त्यासमोर बरीच मोकळी जागा असेल आणि तुम्ही जिथे बसता त्यामागे एक भिंत असेल. तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. वास्तूनुसार अभ्यास किंवा असे काम केल्याने यश मिळते.

6. ज्यांना मुलांचे शिक्षण सुरू करायचे आहे, त्यांनी वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करावी आणि मुलांना मुळाक्षरे शिकवावीत. सनातन धर्मात वसंत पंचमीपासून शिक्षण सुरू करण्याची धार्मिक मान्यता आहे.

7. तुमच्या मुलांनी अभ्यासात वेगवान व्हावे, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत माता सरस्वतीचे चित्र जरूर लावा.

हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Education, Lifestyle, Religion