साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 18 मे : कोणत्याही मंदिरात प्रवेश केल्यानंतर किंवा घरी देवघरातही देवाला पाया पडण्यापूर्वी घंटा वाजवली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत पूजा करताना देवाला पाय पडण्यापूर्वी घंटा वाजवलीच पाहिजे असे मानले जाते. त्यामुळे मंदीरात भाविक प्रथम घंटा वाजवून पुढे देवाकडे जात असतात. मात्र घंटा का वाजली पाहिजे, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसते. याच बद्दल कोल्हापुरातील मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी माहिती दिली आहे.
घंटा वाजवण्यामागे काय कारण?
खरंतर देवापुढे पूजा करताना, दर्शन करताना घरात किंवा मंदिरात पूजा करताना लोक घंटा वाजवत असतात. आपल्या संस्कृतीत कोणत्याही धार्मिक कार्यातील कृती या धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्ट्या महत्त्वाच्या असतात. त्याप्रमाणेच मंदिरात घंटा वाजवण्यामागे देखील वैज्ञानिक आणि धार्मिक अशी दोन्ही कारणे आहेत. घंटेचा निनाद म्हणजे प्रत्यक्ष नादब्रम्ह. घंटानाद हा भगवंताशी आपले नाते जुळवण्याचा सर्वात सोपा आणि अनुकूल मार्ग आहे, असं मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
ही आहेत घंटा वाजवण्यामागची धार्मिक कारणे
1.असे मानले जाते की, काही वेळा मंदिरातील देवता सुप्त अवस्थेत असतात, अशा स्थितीत त्यांना आधी घंटा वाजवून उठवावे आणि नंतर पूजा करावी.
2.मंदिरात आपण जेव्हा घंटा वाजवतो, तेव्हा त्या घंटेतून ध्वनी लहरी निर्माण होतात. त्या ध्वनी लहरींच्या माध्यमातून देवते समोर आपल्या मनातील सर्व विकार दूर होऊन मनाची एकाग्रता साधली जाते. त्यानंतर आपण देवतेला नमस्कार करण्यासाठी स्वतःला पात्र बनवतो.
3. देवतांच्या आणि भक्तांच्या प्रसन्नतेसाठी देखील घंटा वाजवली जाते. असे मानतात की, देवतांना घंटा, शंख इत्यादींचा आवाज खूप आवडतो असे म्हणतात. घंटा वाजल्याने देव प्रसन्न होतात आणि देव भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात. यामुळेच मंदिरात घंटा वाजवली जाते.
काय आहे वैज्ञानिक कारण ?
जेव्हा घंटा वाजते तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर वैज्ञानिक परिणाम होतो. जेव्हा घंटा वाजवली जाते, तेव्हा ती एका आवाजासह मजबूत कंपने निर्माण करते. ही कंपने आपल्या आजूबाजूला पसरतात, ज्याचा फायदा म्हणजे अनेक प्रकारचे हानिकारक सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात आणि त्या सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. यामुळेच मंदिर आणि परिसराचे वातावरण नेहमी अत्यंत पवित्र आणि प्रसन्न असते.
मंदिराच्या कळसावर बसलाय शेषनाग, मंदिरात 9 नागाची कुळं, काय आहे रहस्य?
मंदिरात घंटा बांधण्याचेही आहेत नियम
मंदिररचना शास्त्रात मंदिरात घंटा बांधण्या संदर्भात देखील काही नियम सांगितलेले आहेत. मंदिर उभारतेवेळी देवतेच्या समोर न ठेवता एका बाजूला घंटा बांधण्याची जागा निश्चित केलेली असते. कारण घंटा वाजवणाऱ्या व्यक्तीमुळे पाठीमागच्या व्यक्तीला दर्शन घेताना अडथळा येऊ नये, म्हणून ही जागा ठरवलेली असते. तर कोणत्याही मंदिरात घंटा ही देवतेच्या काटकोनात उभे राहूनच वाजवावी. जर मूर्तीकडे तोंड करून घंटा वाजवली तर देवाला हात उगारला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने घंटा कधीच वाजवू नये, असे देखील राणिंगा यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.