सोलापूर, 14 जानेवारी : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे. आज या यात्रेमध्ये सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील छोट्या-मोठ्या गावातील सर्वच भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा अक्षता सोहळा संपन्न झाला.
अशी झाली अक्षता सोहळ्याला सुरुवात
900 वर्षाची परंपरा असणारी सोलापूरची श्री सिद्धरामेश्वर यांची यात्रा म्हणजे सोलापूरकरांसाठी एक आनंदोत्सवच असतो. यात्रेतील मानाच्या परंपरागत असणाऱ्या मुख्य पाच दिवसांपैकी अक्षता सोहळा हा मानाचा समजला जातो. कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून या अक्षता सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. सर्वच नंदीध्वज अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्ट्याजवळ आले होते. त्यानंतर सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या प्रतिकृतीची सुगडी पूजा झाली. तम्मा शेटे आणि राजशेखर हिरेहब्बू यांच्यात संमतीची विधिवत पूजा पार पडली.
Solapur : सोलापूरची ओळख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास माहिती आहे का? Video
त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख आणि तमा शेटे संमती कट्ट्यावर येऊन संमतीचे वाचन केले. जमलेल्या सर्व भक्तगणांना अक्षता वाटप करून संमतीच्या प्रत्येक वाचनाला अक्षदा टाकला गेला. त्यानंतर सर्वच नंदीध्वज हे अमृत लिंगा जवळ आले. आणि तेथे विधिवत पंचामृत अभिषेक करून पूजा पार पडली.
हा आनंद उत्सव आपल्या परिवारासमवेत साजरा करावा
दोन वर्षानंतर यात्रा सुरळीत चालू झाली. सिद्धेश्वराकडे आमचे एकच मागणे आहे ते म्हणजे सोलापूरकरांना आनंदात ठेवावे आणि कोरोनासारखे किंवा अन्य कोणतेही संकट सोलापूरकरांवर येऊ देऊ नये. शिवाय मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांनीच हा आनंद उत्सव आपल्या परिवारासमवेत साजरा करावा अशी प्रतिक्रिया भाविक युवराज फुटाणे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.