मराठी बातम्या /बातम्या /religion /

समुद्रमंथनातून प्राप्त झाली 'ही' 14 मौल्यवान रत्नं; हिंदू धर्मात आहे खूप महत्त्व

समुद्रमंथनातून प्राप्त झाली 'ही' 14 मौल्यवान रत्नं; हिंदू धर्मात आहे खूप महत्त्व

समुद्र मंथन

समुद्र मंथन

समुद्रमंथनातून केवळ अमृतच नाही तर, उच्छैःश्रव अश्व, ऐरावती हत्ती, लक्ष्मी माता आणि धन्वंतरी यांच्यासह 14 मौल्यवान रत्नं प्राप्त झाली. त्याची हिंदू धर्मातील महत्त्वं जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 नोव्हेंबर :   विष्णु पुराणात समुद्रमंथनाची कथा सविस्तरपणे सांगितली आहे. भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं होतं. समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या अमृत कलशाविषयी अनेकांना माहिती असेल. हा अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये जोरदार वाद झाला होता. समुद्रमंथनातून केवळ अमृतच नाही तर, उच्छैःश्रव अश्व, ऐरावती हत्ती, लक्ष्मी माता आणि धन्वंतरी यांच्यासह 14 मौल्यवान रत्नं प्राप्त झाली. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून समुद्रमंथनाशी संबंधित कथा आणि समुद्रमंथनामधून मिळालेल्या 14 मौल्यवान गोष्टींविषयी जाणून घेऊया.

समुद्र मंथन का झालं?

विष्णु पुराणानुसार, महर्षी दुर्वासांच्या शापामुळे एकदा स्वर्गातील ऐश्वर्य, धन, वैभव संपुष्टात आलं. मग सर्व देव यावर उपाय करण्यासाठी भगवान विष्णूंकडे पोहोचले. विष्णूंनी त्यांना दानवांसह समुद्र मंथन करण्याचा उपाय सांगितला. समुद्रमंथनातून अमृत निघेल, ते घेतल्याने तुम्ही सर्वजण अमर व्हाल, असे विष्णूंनी देवांना सांगितलं. देवतांनी अमृत कलशाविषयी माहिती दानवांचा राजा बळीलादेखील सांगितली. त्यानंतर ते समुद्रमंथनासाठी तयार झाले. वासुकी नागाचा दोरासारखा वापर करून मंदराचल पर्वताच्या साह्याने समुद्रमंथन करण्यात आलं. समुद्रमंथनातून अमृत तर बाहेर पडलेच त्याशिवाय अन्य 13 गोष्टी देखील मिळाल्या. त्या पुढीलप्रमाणे...

जहाल विष : समुद्रमंथनातून सर्वप्रथम जहाल हलाहल नावाचं विष बाहेर पडलं. त्याच्या तीव्र ज्वाळांमुळे सर्व देव-दानव जळू लागले. त्यावेळी सर्वांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. देव, दानव आणि सर्व सृष्टीच्या रक्षणासाठी शंकरांनी हे विष प्राशन केले. विषामुळे शंकराचा कंठ निळा झाला. त्यामुळे भगवान शंकराला नीळकंठ असंही म्हणतात. जेव्हा भगवान शंकर विष पित होते, तेव्हा त्याचे काही थेंब पृथ्वीवर पडले. हे थेंब साप, विंचूं सारख्या विषारी प्राण्यांनी प्यायले.

हेही वाचा -  प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री, दर्श अमावस्या; शेवटच्या आठवड्यात असे आहेत धार्मिक विधी

कामधेनू गाय : जहाल विषानंतर समुद्रमंथनातून कामधेनू गाय बाहेर आली. ही गाय ऋषी-मुनींना देण्यात आली. जसं देवांमध्ये श्री विष्णु, सरोवरांमध्ये समुद्र, नद्यांमध्ये गंगा, पर्वतांमध्ये हिमालय, भाविक भक्तांमध्ये नारदमुनी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये केदारनाथ श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे कामधेनुला गाईच्या प्रजातीत सर्वश्रेष्ठ मानलं जातं.

उच्चैःश्रवा अश्व : कामधेनूनंतर समुद्रमंथनातून उच्छैः श्रवा अश्व बाहेर आला. हा अत्यंत उच्च दर्जाचा अश्व होता. पांढऱ्या रंगाच्या या अश्वामध्ये आकाशात उडण्याची देखील क्षमता होती. हा घोडा दानवांचा राजा बळीला मिळाला. बळी राजाच्या मृत्यूनंतर हा घोडा देवांचा राजा इंद्राला प्राप्त झाला.

ऐरावत हत्ती : समुद्रमंथनातून पांढऱ्या रंगाचा अद्भुत हत्ती बाहेर आला. या हत्तीत आकाशात उडण्याची क्षमता होती. देवांचा राजा इंद्राने हा हत्ती आपले वाहन म्हणून स्वीकारला.

कौस्तुभ मणी : सर्व दागिने आणि रत्नांमध्ये कौस्तुभ रत्नदेखील समुद्रमंथनातून प्राप्त झाले. हे रत्न इतके दिव्य होते की त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. हे रत्न भगवान विष्णूंनी स्वतः धारण केले.

कल्पवृक्ष : कल्पवृक्ष हा दैवी औषधी वृक्ष आहे. यात अनेक आजार बरे करण्याची ताकद आहे. हा वृक्ष देवांचा राजा इंद्राला प्राप्त झाला. इंद्राने हिमालय पर्वताच्या उत्तर दिशेला सुराकानन नावाच्या ठिकाणी कल्पवृक्षाची लागवड केली.

अप्सरा, रंभा : समुद्रमंथनातून सुंदर अप्सरा बाहेर पडल्या. त्यांचे रंभा असे नामकरण करण्यात आले. या देवांना प्राप्त झाल्या. रंभा इंद्राच्या दरबारातील मुख्य नर्तिका बनल्या.

लक्ष्मी माता : भगवान विष्णूंच्या आदेशाने समुद्रमंथन केलं गेलं. लक्ष्मी मातेला परत मिळवणं हा भगवान विष्णूंचा समुद्रमंथनामागील प्रमुख उद्देश होता. कारण जेव्हा विष्णु विश्वाच्या पालनपोषणात व्यस्त होते, तेव्हा लक्ष्मी माता खोल समुद्रात लीन झाली होती. समुद्र मंथनातून लक्ष्मी माता पुन्हा बाहेर आली आणि तिने स्वतः भगवान विष्णूंची निवड केली.

वारुणी : समुद्रमंथनातून ज्या मद्याची उत्पत्ती झाली त्याला वारुणी असं म्हटलं गेलं. विष्णूंच्या आदेशानुसार वारुणी दानवांना मिळाले.

चंद्र : चंद्राची उत्पत्तीही समुद्रमंथनातून झाली. चंद्राची उत्पत्ती पाण्यापासून झाली असल्याने त्याला जलकारक मानलं जातं. भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्राला स्थान दिलं.

पांचजन्य शंख : समुद्रमंथनातून एक दुर्मिळ शंख बाहेर आला. त्याला पांचजन्य शंख असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात या शंखाला विशेष महत्त्व आहे. हा शंख भगवान विष्णूंना मिळाला. त्यामुळे हा शंख जिथे असतो, त्याठिकाणी भगवान विष्णु आणि लक्ष्मी माता वास करतात, असं म्हटलं जातं.

पारिजात : समुद्रमंथनावेळी एक वृक्ष बाहेर पडला, त्याला पारिजात वृक्ष असं म्हटलं गेलं. या वृक्षाला स्पर्श केल्याने शरीराचा थकवा दूर होत असे. पूजेवेळी या वृक्षाची फुलं देवाला वाहणं शुभ मानलं जातं.

शारंग धनुष्य : समुद्रमंथनातून निघालेले हे धनुष्य एक चमत्कारी धनुष्य होते. हे धनुष्य भगवान विष्णूंना प्राप्त झाले.

अमृत : ज्या अमृतासाठी समुद्रमंथन केले होते तेच अमृत शेवटी बाहेर आले. भगवान धन्वंतरी स्वतः अमृत कलश घेऊन प्रकटले. अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये वाद झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि प्रथम देवतांना अमृतपान करायला दिले. अशी ही पुराणातली कथा आहे.

स्वानंद

First published:

Tags: History