मुंबई,12 जानेवारी: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये आणि वैचारिक, आध्यात्मिक जडणघडणीमध्ये अनेक थोर व्यक्तींनी आपलं योगदान दिलेलं आहे. अशाच व्यक्तींमध्ये स्वामी विवेकानंद यांचादेखील समावेश होतो. भारताचे आध्यात्मिक नेते अशी ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद यांची आज 12 जानेवारीला जयंती आहे. हा दिवस ' राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांनी अगदी लहान वयातच संन्यास घेतला होता. जेव्हा ते संन्यासी बनण्याच्या प्रक्रियेत होते तेव्हा एका वेश्येनं त्यांना संन्यासी असण्याचा खरा अर्थ सांगितला होता, असं म्हटलं जातं. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आपल्या गूढवादी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या आधात्मिक गुरु ओशोंच्या गोष्टींमध्ये विवेकानंद यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाचं वर्णन आढळतं. ओशोच्या गोष्टीनुसार, जयपूरच्या राजानं विवेकानंद यांना एकदा निमंत्रण पाठवलं होतं. जयपूरचे राजा विवेकानंदांचे मोठे प्रशंसक होते. राजेशाही परंपरेनुसार विवेकानंदांच्या स्वागतासाठी राजानं अनेक नर्तकांना बोलावलं होतं. त्यांच्यामध्ये एका वेश्येचाही समावेश होता. नंतर, राजाला आपली चूक लक्षात आली. एका संन्यासी व्यक्तीचा पाहुणचार करताना वेश्येला बोलावू नये. संन्याश्यांसाठी ही बाब अपवित्र मानली जाते, हे त्याच्या लक्षात आलं. मात्र, राजाला हे कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. राजानं वेश्येला आधीच राजवाड्यात बोलावलं होतं आणि सर्व व्यवस्था केली होती.
श्रीमंत महिलेने दिला होता लग्नाचा प्रस्ताव, तरीही स्वामी विवेकानंदांनी का दिला नकार !
विवेकानंदांना हे समजताच ते अस्वस्थ झाले. जर ते पूर्ण संन्यासी झाले असते तर वेश्येच्या सान्निध्यात राहण्याचा त्यांना काहीही फरक पडला नसता. पण, ते अजून पूर्ण संन्यासी बनले नव्हते. संन्यासी होण्याचा प्रक्रियेत विवेकानंद आपल्या लैंगिक इच्छांवरदेखील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून, वेश्येला टाळण्यासाठी त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं आणि बाहेर येण्यास नकार दिला.
राजानं येऊन विवेकानंदांची माफी मागितली. या पूर्वी कधीही साधूचा पाहुणचार न केल्यामुळे काय करावं हे आपल्याला समजलं नाही, असं राजा म्हणाला. त्यानं विवेकानंदांना खोलीतून बाहेर येण्याची विनंती केली. राजवाड्यात आलेली वेश्या ही त्या काळातील भारतातील सुपरिचित वेश्या असून तिला अचानक परत पाठवणं हा अपमान होईल, असंही राजा म्हणाला. पण, विवेकानंदांनी वेश्येसमोर येण्यास नकार दिला.
विवेकानंदाचं बोलणं ऐकून वेश्या निराश झाली आणि तिनं विवेकानंदांसाठी गाणी म्हणायला सुरुवात केली. या गाण्याच्या माध्यमातून ती म्हणाली, 'मला माहीत आहे, मी तुमच्यासाठी योग्य नाही. पण, तुम्ही माझ्यावर थोडी दया करा. मला माहीत आहे की मी रस्त्यावरची घाण आहे. पण, तुम्ही माझा तिरस्कार करण्याची गरज नाही. माझं काही अस्तित्व नाही. मी अज्ञानी आहे. मी पापी आहे. पण, तुम्ही तर एक संत आहात. मग, मला का घाबरता?'
हे सर्व ऐकून विवेकानंदांना अचानक आपली चूक लक्षात आली. त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याच मनात वेश्येच्या आकर्षणाची भीती आहे. ही भीती सोडली तर मन शांत होईल आणि ते संन्यासी होण्याकडे वाटचाल करू शकू. गाणं ऐकून त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडला आणि वेश्येला नमस्कार केला. ते वेश्येला म्हणाले, "देवानं आज एक मोठं रहस्य उघड केलं आहे. माझ्याच मनात वासनेची भीती होती. पण, तू माझा पूर्ण पराभव केलास. असा शुद्ध आत्मा मी याआधी पाहिलेला नाही. आता या पुढे मी तुझ्यासोबत एकातांत जरी राहिलो तरी मला काही भीती नाही."
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle