मुंबई, 3 डिसेंबर: ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे ग्रहदेखील महत्त्वपूर्ण मानले जातात. राहू आणि केतू हे ग्रह नसून त्यांना पाप किंवा छाया ग्रह असं म्हटलं जातं. अनेक लोकांच्या मनात शनिनंतर राहूविषयी भीती असते. राहू हा ग्रह अचानक बदल, घटनांचा कारक मानला जातो. जीवनात अचानक घडणाऱ्या बऱ्या आणि वाईट घटनांमागे राहूचे भ्रमण कारणीभूत असते, असे ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक सांगतात. राहू आणि केतूदेखील दर 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतात. राहू आणि केतू हे कायम वक्री असतात. सध्या राहू मंगळाच्या मेष तर केतू शुक्राच्या तुळ राशीतून भ्रमण करत आहे. पुढच्या वर्षी अर्थात ऑक्टोबर 2023 मध्ये हे दोन्ही ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. यावेळी राहू गुरुच्या मीन राशीत करेल. राहूचं मीन राशीतील भ्रमण प्रामुख्याने तीन राशींसाठी कष्टदायक आणि अशुभ फलदायक असेल.
आगामी 2023 मध्ये शनि आणि गुरुसोबत राहूदेखील राशीपरिवर्तन करणार आहे. शनि दर अडीच वर्षांनी तर गुरु सुमारे एक वर्षांनी राशी परिवर्तन करतो. राहू नेहमी उलट्या दिशेनं भ्रमण करत दर 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतो. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. राहू हा शनिप्रमाणे फळं देतो असं मानलं जातं. राहू ज्या राशीतून गोचर भ्रमण करतो, त्या राशीच्या स्वामीच्या स्थितीनुसार संबंधित व्यक्तीला राहुची शुभ- अशुभ फळे मिळतात. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध उत्तम स्थितीत असेल तर राहू कधीही अशुभ फळ देत नाही. आगामी वर्षातील राहूचं मीन राशीतून होणारं भ्रमण प्रामुख्याने तीन राशींसाठी कष्टदायी आणि अशुभ असेल.
हेही वाचा: Mobile Numerology : मोबाईल नंबरमधील या आकड्याचा आरोग्याशी खास संबंध; नसेल तर अनेक आजारांना आमंत्रण
मेष : 2023 मध्ये राहु तुमच्या राशीपासून बाराव्या स्थानात प्रवेश करेल. कुंडलीतील या स्थानावरून परदेशागमन, एकाकी जीवन, तुरुंगवास, मोक्ष आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. वैदिक ज्योतिष शास्त्रात हे स्थान अशुभ मानलं गेलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला राहू तुमच्या राशीतून भ्रमण करेल. यामुळे तुमच्या मनात संभ्रमाची स्थिती असेल. एखादा घाईघाईने घेतला तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. या वर्षात तुम्हाला अचानक मोठा खर्च होऊ शकतो. मे ते ऑगस्ट दरम्यान गुरु-चांडाळ दोष तयार होत आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 2023 मध्ये राहू बाराव्या स्थानात गेल्यावर त्याची तुमच्या कुंडलीतील अष्टम, षष्ठ आणि चौथ्या स्थानावर दृष्टी पडेल. यामुळे आर्थिक नुकसान आणि आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. अपघाताचे योग असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी. शत्रुंपासून सावध राहावे. कौटुंबिक वादा पासून दूर राहावे.
सिंह : 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू तुमच्या कुंडलीतील आठव्या स्थानात प्रवेश करेल. कुंडलीतील आठवे स्थान हे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या आरोग्य, कार्यक्षेत्र आणि कामातील समस्या वाढतील. गुंतवणूक विचारपुर्वक करा. वाहन चालवताना काळजी घ्या. पुढील वर्षात इतर कोणाच्या म्हणण्यात अडकू नका. या वर्षात राहू तुमच्या अष्टम स्थानातून गोचर करताना बाराव्या, दुसऱ्या आणि चौथ्या स्थानवर दृष्टी टाकेल. त्यामुळे सिंह राशीचे जे जातक भागीदारीत व्यवसाय किंवा काम करत आहेत, त्यांचे मोठे नुकसान होऊ शकतं. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद निर्माण होऊ शकतात आणि प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचू शकते.
मीन : 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू तुमच्या दुसऱ्या भावातून लग्न भावात म्हणजे तुमच्याच राशीत प्रवेश करेल. लग्न भावावरून संबंधित व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास केला जातो. या स्थानातील राहू पाचव्या, सातव्या आणि नवव्या भावावर दृष्टी टाकेल. 2023 मध्ये एखादा मोठा निर्णय घेताना तुमच्याकडून चूक होऊ शकते. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूकीत तोटा होऊ शकतो. प्रतिष्ठा कलंकित होऊ शकते. तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात वियोग आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. 2023 च्या सुरुवातील राहू तुमच्या कुंडलीत दुसऱ्यात स्थान असेल.यामुळे तुम्हाला काही मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.