मराठी बातम्या /बातम्या /religion /

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात तुम्ही खाऊ नका आणि पितरांनाही दाखवू नका; या 5 पदार्थांमुळे लागू शकतो पितृदोष

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात तुम्ही खाऊ नका आणि पितरांनाही दाखवू नका; या 5 पदार्थांमुळे लागू शकतो पितृदोष

पितृपक्षात या पदार्थांचं सेवन टाळा. (प्रतीकात्मक फोटो)

पितृपक्षात या पदार्थांचं सेवन टाळा. (प्रतीकात्मक फोटो)

पितृपक्षातील खाण्यापिण्याचेही काही नियम आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 सप्टेंबर : हिंदू धर्मानुसार घरातल्या दिवंगत व्यक्तींच्या मृतात्म्यास शांती मिळावी यासाठी श्राद्ध विधी केला जातो. दिवंगत व्यक्तीचं वार्षिक श्राद्ध केलं जातं. तसंच, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षातही पितरांना आदरांजली वाहिली जाते. यंदा 10 सप्टेंबरपासून 25 सप्टेंबरपर्यंत पितृपंधरवडा आहे. या दिवसांत पितरांच्या आठवणीसाठी तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. नियमितपणे हे विधी केल्यास आपल्या पितरांची आपल्यावर कृपा राहते आणि कार्य सिद्धीस जातं.

या पंधरा दिवसात हिंदू धर्मानुसार खाण्यापिण्याचेही काही नियम आहेत. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ या.

मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं

हिंदू धर्मातल्या रीतींनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंडं खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे. दारू पिणं, विडी-सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं या गोष्टीही निषिद्ध (Giving up on Alcohol & Cigarette) मानल्या गेल्या आहेत.

कंदमुळं खाऊ नका

हिंदू धर्मानुसार, जमिनीखाली तयार होणार्‍या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन या पंधरा दिवसांत वर्ज्य आहे. कंदमुळांमध्ये बटाटा, मुळा, रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. तसंच कंदमुळांचा नैवेद्य दाखवणं, त्यांचं स्वत: सेवन करणं किंवा श्राद्धाच्या भोजनातही कंदमूळयुक्त भाज्या असू नयेत असं शास्त्रात म्हटलं गेलंय. या गोष्टींचं पालन न केल्यास पितरांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, असं म्हटलं जातं.

हे वाचा - Pitra Dosh: पितृदोष असेल तर घरात अशा समस्या निर्माण होतात, वेळीच ओळखून करा उपाय

लसूण-कांदा यांचं सेवन निषिद्ध

हिंदू धर्मात असं म्हटलं गेलंय, की प्रत्येक खाद्यपदार्थांच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर, मानसिकतेवर परिणाम होत असतो. पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्त्विक असावा असं शास्त्र सांगतं. तामसी वृत्ती म्हणजे स्वभावात तापटपणा, चिडचिड याची वाढ होऊ नये, पित्त वाढू नये यासाठी कांदा आणि लसूण यांसारखे तामसी गुण वाढवणारे खाद्यपदार्थ खाणं टाळावं. हिंदू धर्मातल्या विविध धार्मिक विधींनंतर होणार्‍या जेवणातही कांदा-लसूण यांचा वापर निषिद्ध म्हणजेच वर्ज्य मानला आहे. म्हणूनच या पितृपक्षाच्या दिवसात कांदा-लसूण खाणं टाळावं.

मसूर डाळीचं सेवन टाळावं

पितृपक्षात मसूर डाळ खाणंही वर्ज्य मानलं गेलंय. मसूर डाळीचं सेवन निषिद्ध आहेच; पण कुठलंही कच्च धान्य खाणंही टाळावं. या दिवसात कुठलाही पदार्थ शिजवूनच खायला (Cooked Meal) हवा असं शास्त्रात म्हटलं आहे.

हे वाचा - Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात कावळे इतके महत्त्वाचे का? त्यांनाच का दिलं जातं अन्न?

चणेही खाऊ नयेत

शास्त्रात दिल्याप्रमाणे पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे. म्हणूनच तर्पण आणि श्राद्ध विधी करणार्‍या यजमानांनी चणे खाणं टाळावं, इतकंच नाही तर चण्याच्या डाळीची आमटी, चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई (Besan Sweets) किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळावं.

(सूचना - हा लेख सर्वसामान्य धार्मिक माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी किंवा हमी देत नाही.)

First published:

Tags: Culture and tradition, Lifestyle