मुंबई, 28 मार्च : ज्योतिष शास्त्रामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक छोटे-छोटे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यापैकी एक सोपा उपाय म्हणजे घरात मोराचे पंख ठेवणे. ज्योतिषशास्त्रानुसार, मोरपंख आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात, जीवनात सकारात्मक उर्जेचा संचार वाढवतात. भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहेत आणि श्रीकृष्णाच्या मुकुटावर लावले जातात. पौराणिक काळात महर्षींनी मोरपंखी कलम (मोरपंखांचा पेनाप्रमाणे वापर) वापरून मोठमोठे ग्रंथही रचले. या सर्व गोष्टी आपल्यासाठी मोराचे पंख किती महत्त्वाचे आणि पवित्र आहेत हे दर्शवितात. ज्योतिष शास्त्रानुसार, मोरपंखांचे काही उपाय केले जातात, ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तूतज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत, मोरपंखांचे काही सोपे उपाय.
गृहक्लेशातून सुटका होण्यासाठी -
जर एखाद्या व्यक्तीच्या घरात दीर्घकाळापासून ग्रहसंकट येत असेल तर त्या व्यक्तीने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर मोराची तीन पिसे लावून “ॐ द्वारपालाय नमः जाग्रय स्थापये स्वाहा” हा मंत्र लिहावा आणि खाली गणपतीची मूर्ती ठेवावी. . असे मानले जाते की, असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. यासोबतच त्यामुळे विषारी प्राणी घरात शिरू शकत नाहीत.
शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी -
शनिवार आणि मंगळवारी बजरंगबलीच्या कपाळावर लावलेला सिंदूर घ्या, तो मोरपंखाला लावा आणि सकाळी तोंड न धुता ते मोरपंख वाहत्या पाण्यात सोडा. धार्मिक श्रद्धेनुसार, असं केल्यानं तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल.
वास्तू दोष निवारणासाठी -
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराची वास्तू योग्य नाही किंवा कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आहे तर ते दूर करण्यासाठी तुमच्या घराच्या आग्नेय कोपर्यात म्हणजेच पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये मोराचे पंख लावावेत. याशिवाय तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यावर भगवान श्रीकृष्णाच्या फोटोसह मोराची पिसे लावू शकता. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.
ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी -
कुंडलीतील कोणताही ग्रह तुम्हाला त्रास देत असेल तर त्या ग्रहाच्या मंत्राचा 21 वेळा उच्चार करून मोरपंखावर पाणी शिंपडावे आणि ते मोरपीस घरात कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. मान्यतेनुसार असे केल्याने ग्रहाचा खराब प्रभाव लवकर दूर होतो. मात्र, मोरपीस हे मोराच्या अंगावरून आपोआप निघून पडलेले असावे. त्यासाठी मोराला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्राणी-पक्षांना त्रास दिल्याने भारतात कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे.
हे वाचा - दारात तुळस असेल तर चैत्र नवरात्रीत करा हे काम; कुटुंबावर राहील जगदंबेची कृपा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.