मुंबई, 02 डिसेंबर : घराच्या सभोवतालचा परिसर प्रसन्न, सकारात्मक राहावा यासाठी आपण घरासमोरील अंगणात, टेरेसमध्ये निरनिराळ्या प्रकारची झाडं, रोपं लावतो. यामुळे घरात सुख-समृद्धी, समाधान येतं, असं मानलं जातं. अलीकडच्या काळात सुखद वाटणारी रोपं, झाडं घरासमोर लावण्याकडे कल वाढला आहे. मात्र, काही झाडं किंवा रोपं घराच्या परिसरात लावणं वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानलं गेलं आहे. काही झाडं, रोपं अंगणात लावली तर त्यामुळे संबंधित कुटुंबाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्याउलट घराच्या अंगणात काही झाडं, रोपं लावली तर घरात आर्थिक सुबत्ता कायम राहते, असं वास्तुशास्त्राच्या जाणकारांचं मत आहे. घरात नकारात्मकता वाढवणाऱ्या झाडं, रोपांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. आज तकने या विषयीची माहिती दिली आहे.
झाडं, रोपांमुळे घर आणि परिसराचं केवळ सौंदर्य, प्रसन्नता वाढत नाही तर त्यामुळे आर्थिक उत्कर्षदेखील होतो. वास्तुशास्त्रात झाडं, रोपांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. काही खास झाडं, रोपं घराच्या अंगणात असतील तर त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. मात्र काही झाडं, रोपांमुळे नुकसानदेखील होऊ शकतं.
ज्या रोपं किंवा झाडांमधून दुधासारखा पांढरा द्रव पदार्थ येतो, अशी झाडं किंवा रोपं घराच्या अंगणात कदापि लावू नयेत. घराच्या अंगणात रुईचं झाड लावू नये. हे झाडं घराच्या समोर असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. रुईच्या झाडाला आक असंही संबोधलं जातं.
सणासुदीला किंवा शुभ दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. पण वास्तुशास्त्रानुसार, घराच्या अंगणात पिंपळाचं झाडं असेल तर त्यामुळे घरात नकारात्मक परिणाम जाणवतात. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे घराच्या अंगणात पिंपळाचे झाड नसावं.
कोणत्याही प्रकारच्या चिंचेचं झाड घराच्या अंगणात लावू नये. या झाडामुळे नकारात्मकता निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या घराच्या अंगणात चिंचेचं झाड असतं, त्याची आर्थिक स्थिती नेहमीच अस्थिर असते. तसेच घराच्या समोर चिंचेचं झाड असेल तर कौटुंबिक नात्यात कटुता निर्माण होते.
हे वाचा - पितळेच्या भांड्याचा हा एक उपाय नशीब बदलेल; पूजेशिवाय असा करा उपयोग
घराच्या समोर बोराचं झाड असणं अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, या झाडाला काटे असतात, त्यामुळे हे झाड घराच्या अंगणात लावणं किंवा असणं अशुभ मानलं जातं. ज्या घराच्या अंगणात बोराचं झाड असतं, त्या घरातील कुटुंबियांमध्ये कायम वादविवाद होतात. घरातील सुख-शांती नाहीशी होते आणि आर्थिक चणचण भासू लागते.
हे वाचा - हे 8 गुण असलेली माणसं कधीच होत नाहीत दु:खी; काय सांगते विदुर नीति?
वास्तुशास्त्रानुसार, खजुराचं झाड घराच्या अंगणात कदापि लावू नये. या झाडामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे झाड जर घराच्या अंगणात असेल तर संबंधित कुटुंबाला दारिद्र्य येतं. कामामध्ये अपयश येऊ लागतं. प्रगतीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घरासमोर कोणतंही झाडं किंवा रोप लावण्यापूर्वी वास्तुशास्त्राच्या जाणकारांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.