वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 22 मार्च : सातपुड्याच्या कुशीतून उमग पावलेल्या वर्धा नदीच्या तिरावर पुलगावातील मोक्षधाम परिसराला 'पंचधारा' असे म्हणतात. पंचधारा हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षीसुद्धा येत असतात. याच निसर्गरम्य ठिकाणी असणारे पंचधारेश्वर मंदिर हे शिवभक्तांचे श्रद्धास्तान आहे.
पंचधारा नावामागे आहे खास कारण
सातपुड्यात उगम पावलेली वर्धा नदी ही दक्षिण वाहिनी आहे. पूर्वी तिच्या पाचधारा येथील जलकुंडामध्ये पडत म्हणून याला 'पंचधारा' असे संबोधले जाते. याच परिसरात असणाऱ्या प्राचीन शिव मंदिराला पंचधारेश्वर शिव मंदिर म्हणून ओळखले जाते.
ऐतिहासिक शिवमंदिर
या परिसरातील शिव मंदिराबाहेर आधी 9 समाध्या होत्या. त्यावरून इतिहासकार हे मंदिर साडेचारशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त करतात. आता मंदिर परिसरात त्या दिसून येत नाहीत. या मंदिराची वास्तू रचना, शिल्प, मूर्त्या या मंदिरापेक्षाही जास्त प्राचीन असल्याचे सिद्ध करतात. पंचधारेश्वर शिवालयाचे गर्भगृह इतर शिवालयांप्रमाणे जगती किंवा मंड यावर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार पूर्वेकडे असून गर्भगृहाच्या आत शिवलिंगाची स्थापना समतल करण्यात आलेली आहे. जवळच नंदीदेखील आहे.
चक्क यज्ञ आणि हवनातून सेंद्रिय शेती, कुठे होतोय हा प्रयोग
प्राचीन शैलीतील मंदिर
गर्भगृह आतून विशाल, अत्यंत कलात्मक व कोरीव कामाने युक्त असे आहे. येथे चार कोपऱ्यांवर चार अर्धस्तंभ असून, तेही अत्यंत कलात्मक आहेत. त्यावर कमळ, मोर, अष्टभुजाधारी, गणपती, चक्र, पुष्प आदी कोरलेले आहेत. तर भिंतीवर सुंदर अशा कमानी कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील दरवाजांच्या दोन्ही बाजू अत्यंत सौंदर्यपूर्ण आहेत. मात्र, येथील प्राचीन दरवाजे आज याठिकाणी नाहीत. त्याऐवजी आता येथे लोखंडी दरवाजे बसविण्यात आले आहेत.
दक्षिणेला 19 प्रतिमा
पंचधारा शिव मंदिराच्या प्रवेशद्वाराकडील बाह्य भाग जरी सौंदर्यपूर्ण नसला तरी पश्चिम, उत्तर आणि दक्षिणी भागांवर कलात्मकता दिसून येते. दक्षिणेत गर्भगृहाच्या बाह्यंगावर एकूण 19 प्रतिमा असून, मध्यभागी हनुमानाची मूर्ती स्थानक अवस्थेत दिसून येते. येथे अश्व, सिंह, मनुष्य, स्त्री, हत्ती, पोपट आदींचे व्यालही दिसून येतात. मंदिराच्या मागे पश्चिमेकडेही अशाच 19 प्रतिमा आहेत. येथे हातात खड्डू व ढाल असलेली मूर्ती आहे.
Beed News: स्वप्नातील 'त्या' निरोपानंतर उभं राहिलं नरसिंहाचं मंदिर, पाहा अख्यायिका! Video
उत्तरेला 18 प्रतिमा
उत्तरेत चक्र-गदाधारी विष्णूची मूर्ती असून, इतर 18 प्रतिमा मयूर सिंह, चक्र, पुष्प आदींच्या आहेत. याच दिशेने सभामंडपाच्या बाह्य भागातही अनेक प्रतिमा आढळून येतात. त्यात विष्णु, ब्रह्म, गणपती, विष्णू , हनुमान, वरुण, सर्प, अश्वारोही, हत्ती, सिंह, मयूर इत्यादी आहेत. या संपूर्ण बाह्यगाचे परकोट उमललेल्या कमळाप्रमाणे बनविण्यात आले आहे. मंदिराबाबत कला व विज्ञान महाविद्यालय, पुलगाव येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदीप हातेवार यांनी माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Famous temples, Local18, Wardha, Wardha news