मुंबई, 09 फेब्रुवारी : हिंदू धर्मात अमावास्या, पौर्णिमेसह एकादशी, चतुर्थीसारख्या काही तिथींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक जण आपल्या आराध्य देव-देवतांचं विधिवत पूजन करतात. जीवनात सुख-समृद्धी, यश, पैसा आदी गोष्टी मिळाव्यात हा या आराधनेमागचा प्रमुख उद्देश असतो. आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते; मात्र दर महिन्याच्या एकादशींच्या व्रताच्या माध्यमातूनही भगवान विष्णूची आराधना केली जाते. एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास जीवनातल्या सर्व समस्या आणि दुःखं दूर होतात, असं मानलं जातं.
दर महिन्याच्या एकादशीला भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. याला एकादशी व्रत असंही म्हणतात. एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमुळे संबंधित व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि पिशाच्चयोनीच्या भयापासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. एकादशी दिवशी भाविकांनी काही विशेष नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नियमांचं पालन करून भगवान विष्णूची आराधना केल्यास शुभ फलप्राप्ती होऊ शकते, असं ज्योतिष जाणकारांनी सांगितलं.
एकादशीला पवित्र स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्या दिवशी शक्य असल्यास पवित्र गंगा नदीत स्नान करावं आणि हळद, केशर आणि केळी दान करावीत. या दिवशी घरी येणाऱ्या साधू-संतांना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. त्यांना अन्न, धन किंवा वस्त्र दान केल्यास पुण्यफलप्राप्ती होते. एकादशीला व्रत करावं आणि त्या महिन्यातील एकादशी व्रताची कथा श्रवण करावी. हे करणं उपासकांसाठी फलदायी मानलं जातं. त्यामुळे भाविक-भक्तांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. कोणत्याही एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना करावी आणि पूजेसाठी तुळशीपत्र आणि पंचामृत वापरावं. या दोन्ही गोष्टी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत. यामुळे विष्णूची कृपादृष्टी लाभते.
हे वाचा - शनी-सूर्य कुंभमध्ये!30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; 3 राशी जोमात
एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी भात, पान, वांगी, कोबी आणि पालक आदींचं सेवन करू नये. यामुळे दोष निर्माण होऊन भय वाढतं. एकादशीला तामसी पदार्थांचं सेवन टाळावं. यामुळे नुकसान होऊ शकते. यादिवशी मांस, मद्य, कांदा आणि लसूण आहारात असू नये. सात्त्विक आहार घ्यावा. एकादशीला घरात केरसुणी वापरू नये. कारण केरसुणी वापरल्यास लहान जिवांची हत्या होण्याचं भय वाढतं. यामुळे जीव-हत्येचा दोष लागू शकतो, असे पौराणिक कथांमध्ये म्हटलं आहे. एकादशीचं व्रत करणाऱ्याने आपल्या मनात इतर व्यक्तीविषयी वाईट किंवा कटू विचार आणू नयेत. यामुळे त्याच्यावर उलटा परिणाम होण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.