मुंबई, 06 नोव्हेंबर: मागील महिन्यात ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झालं होतं. आता या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण येत्या मंगळवारी (8 नोव्हेंबर 2022) म्हणजे पुढच्याच आठवड्यात आहे. वर्षातलं हे शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणाच्या दिवशी दिवसाची सुरुवात कशी करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, देवी लक्ष्मीचं मन प्रसन्न होण्यासाठी पूजा कशा पद्धतीनं करावी, याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हिंदू पद्धतीची दोन पंचांगं वापरली जातात. त्यानुसार सण, उत्सव, ग्रहणाचा कालावधी गृहित धरतात. पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते. यंदा देव दिवाळी 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार होती. पण याच दिवशी चंद्रग्रहण आहे. हिंदू धर्मात चंद्रग्रहणाला धार्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे यंदा कार्तिक पौर्णिमा व देव दिवाळीचा सण हा 8 नोव्हेंबर ऐवजी 7 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला अंगण सजवा रांगोळीने, या आहेत काही सोप्या आणि सुंदर डिझाईन
तर, दुसरीकडे चंद्रग्रहणाच्या दिवशी धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं पूजा करणं फायद्याचं ठरू शकते. चला तर, चंद्रग्रहणाच्या दिवशी दिवसाची सुरुवात कशी करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास देवी लक्ष्मीचं मन प्रसन्न होऊन भक्तांच्या श्रद्धा पूर्ण होतील, याबाबत जाणून घेऊयात.
चंद्रग्रहणाच्या दिवशी देवी लक्ष्मीची अशी करा पूजा
- या दिवशी सकाळी उठून स्नान करा.
- आंघोळीनंतर पिवळे कपडे घाला.
- पूजेचे ताट घ्या आणि त्याच्या मध्यभागी स्वस्तिक किंवा ओम तयार करा.
- आता मान्यतेनुसार पूजेच्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेऊन त्यावर एक वस्त्र टाका, व त्यावर पूजेचं ताट ठेवा, आणि त्यावर महालक्ष्मी यंत्र किंवा श्रीयंत्राची स्थापना करा.
- पूजेच्या ताटात श्रीयंत्रासोबत शंख स्थापित करा. शंखासाठी पूजेचे दुसरं ताट सुद्धा घेता येईल.
- आता शंख असलेल्या ताटात तुपाचा दिवा लावावा, म्हणजे तो पूजेच्या थाळीसारखा दिसू लागतो. या थाळीत मूठभर तांदूळ ठेवता येतील.
- हातामध्ये जपमाळ घेऊन 'ॐ पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते' या मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते.
- धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या आधी हे पूजेचे ताट मंदिरात ठेवता येते, आणि चंद्रग्रहणानंतर ते नदी किंवा तलावात विसर्जित केलं जातं. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असे म्हटलं जातं.
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाचा काळ हा सुतक कालावधी असतो. ग्रहण काळात काही कार्य करण्यास मनाई आहे. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य करण्यात येत नाही. हा काळ शांततेनं आणि संयमानं पार पाडावा लागतो.
यंदाच्या वर्षी होणारं शेवटचं चंद्रग्रहण अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. अशावेळी या चंद्रग्रहणाचं धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करणे फायद्याचं ठरतं, अशी मान्यता आहे. अर्थात त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali