मुंबई, 23 मार्च: हिंदू धर्मात नवरात्रोत्सव खूप खास आहे. 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली. नवरात्रीत नऊ दिवस पूजा आणि मंत्रजप केल्याने माँ दुर्गा विशेषत: प्रसन्न होते. असे मानले जाते की माँ दुर्गा नवरात्रीला पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. देवी दुर्गा ही पंचदेवांपैकी एक मानली जाते. नवरात्रीत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी सर्व शक्तिपीठांवर भाविकांची मोठी गर्दी होते. देवी दुर्गा अनेक नावांनी ओळखली जाते. यातील काही नावे सर्वाधिक लोकप्रिय आहेत आणि या नावांमागे वेगवेगळ्या कथा आहेत. देवी दुर्गेची सर्वात लोकप्रिय नावे पुढीलप्रमाणे आहेत - महिषासुरमर्दिनी, देवी दुर्गा, जगदंबा, विंध्यवासिनी, शेरावली माँ, शाकंभरी, शैलपुत्री, भद्रकाली आणि चामुंडा.
महिषासुरमर्दिनी
पुराणानुसार, महिषासुर या राक्षसाची तिन्ही लोकांमध्ये दहशत असताना महिषासुराच्या दहशतीपासून मुक्त होण्यासाठी आणि त्याचा वध करण्यासाठी सर्व देवी-देवतांनी मिळून प्रार्थना केल्याने देवी दुर्गा प्रकट झाली. त्यानंतर देवीने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि त्याचा वध केला. महिषासुराच्या वधामुळे तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात.
देवी दुर्गा
ब्रह्माकडून मिळालेल्या वरदानामुळे कोणताही देव महिषासुराचा वध करू शकला नाही, मग सर्व देवांनी मिळून महिषासुराचा वध करण्यासाठी देवी दुर्गा प्रकट केली. अत्यंत कठीण काम केल्यामुळे देवीचे नाव दुर्गा ठेवण्यात आले. दुर्गा म्हणजे दुर्गम ज्याला जिंकणे कठीण आहे. दुष्टांचा नाश केल्यामुळे तिला दुर्गा हे नाव पडले.
जगदंबा
जगदंबा हेदेखील देवी दुर्गेचे नाव आहे. आई जगदंबा ही संपूर्ण जगाची आणि विश्वाची माता मानली जाते. या कारणास्तव तिला जगदंबा माता असे नाव पडले.
विंध्यवासिनी
विंध्यवासिनी हे माँ दुर्गेचे प्रसिद्ध नाव आहे. पुराणानुसार देवीचे निवासस्थान विंध्याचल पर्वतावर असल्याचे मानले जाते. यामुळे तिची विंध्यवासिनी या नावाने पूजा केली जाते.
शेरावाली
सिंहावर स्वार झाल्यामुळे देवीला शेरावाली असेही म्हणतात. सिंहावर स्वार होऊन मातेने राक्षसांना मारले.
आई शाकंभरी
शाकंभरी देवी हेदेखील मातेचे लोकप्रिय नाव आहे. धर्मग्रंथानुसार, पृथ्वीवर एकदा दुष्काळ पडला, तेव्हा या संकटाचा अंत करण्यासाठी तिने सर्व वनस्पती आणि भाज्यांसह अवतार घेतला. मातेचे हे रूप शाकंभरी या नावाने ओळखले जाते.
शैलपुत्री
शैल म्हणजे पर्वत. पर्वतराज हिमालयाचे अपत्य असल्याने तिला देवी शैलपुत्री असेही म्हणतात.
भद्रकाली
देवी दुर्गाला भद्रकाली असेही म्हणतात. देवी कालीच्या भयंकर रूपाला भद्रकाली म्हणतात. आईच्या या रूपात तिचा रंग काळा आहे.
चामुंडा
देवीने चंड आणि मुंड नावाच्या दोन राक्षसांचा वध केला होता, त्यामुळे देवीला चामुंडा हे नाव देखील पडले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion