पुणे, 1 मार्च : एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीसमोरच गोळीबार केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील जांभूत फाटा इथे संध्याकाळी 6 वाजता घडली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अक्षय भाऊसाहेब दंडवते असं 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे.
आरोपीने गावठी कट्ट्यातून चार राऊंड फायर केले. आरोपी अक्षय दंडवते हा वाफगाव ता. जुन्नर येथील आहे. पोलिसांनी आरोपीला आळेफाटा परिसरातून चार तासाच्या आत पडकलं. आळेफाटा पोलीस स्टेशन आणि नारायण गाव पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली.
पोलीस प्रशिक्षण अकादमीत शिकणारी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत क्लास संपल्यानंतर घरी चालली होती. मात्र वाटेतच जांभूतफाटा इथं आल्यानंतर आरोपी अक्षय दंडवते हा आपल्या दुचाकीवरून तिथं आला. 'त्याने आधी माझ्या डोक्याला पिस्तुल लावून मला गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी सुटलीच नाही. असा प्रयत्न त्याने पाच ते सहा वेळा केला. मी तुला मारून स्वत:ही मरेन, असं तो म्हणत होता. मात्र त्याला गोळी मारता आली नाही. त्यानंतर मी आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजूचे लोक तिथं जमले. लोक आल्याचे पाहताच तो तिथून पळून गेला,' असं पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा - मुलाला वाचवण्यासाठी आईने घेतली धाव, पण दोघांनाही गमावावा लागला जीव
'आरोपी अक्षय दंडवते आणि मी आधी कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकत होते. तेव्हा त्या दोघांचं बोलणं होत होतं. तेव्हाही तो मला त्रास देत होता. कॉलेज संपल्यानंतरही हा त्रास सुरू होता,' असा पीडित मुलीचा आरोप आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.