पुणे 20 मार्च : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या या प्रसाराचं कारण लोकांमधील वाढता हलगर्जीपणा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आश्चर्यचकीत करणारी गोष्ट ही आहे की पुण्यातही कोरोनाचे अनेक नवे रुग्ण (Corona Cases In Pune) समोर येत आहेत. राहाण्यासाठी सर्वाधिक योग्य शहरांच्या यादीत पुण्याचा क्रमांक दुसरा आहे. इथे साक्षरतेचा दरही 89.45 टक्के इतका आहे. इतकंच नाही तर आयटी प्रोफेशनल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचाही या शहरात दबदबा आहे. इथे अनेक सुशिक्षित लोक राहातात जे कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. मात्र, असं असतानाही पुण्यात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागच्या चोवीस तासात राज्यात 5098 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुण्याचा देशात पहिला क्रमांक आहे. अशात हा अभ्यासाचा विषय आहे, की पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या इतकी झपाट्यानं का वाढत आहे (Corona Cases Increasing in Pune).
CMC चे मेडिकल ऑफिसर पवन साळवे यांनी सांगितलं, की शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठं अंतर आहे. तापमानात इतका जास्त बदल झाल्यानं लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीवर याचा परिणाम झाला आहे. याच कारणामुळे हे लोक कोरोनाच्या विळख्यात लवकर येत आहेत. मागील काही दिवसात ज्या लोकांमध्ये तापासारखी लक्षणं दिसत आहेत त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली गेली आहे. या कारणामुळेही अधिक रुग्णसंख्या समोर येत आहे. देशाच्या कोणत्याच भागात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात नाहीये. हेदेखील इतर ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय साळवे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचं कारण वाढतं शहरीकरण आणि ट्राफीकही सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं, की बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच कोरोनाचा प्रसार अधिक होत आहे.
या कारणांमुळे वाढतोय प्रसार -
१) दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील मोठं अंतर यामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम
२) होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या सत्तर टक्के रुग्णांचा हलगर्जीपणा
३) देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कमी झालेली लोकांच्या मनातील भीती
४) पुण्यात वाढतं शहरीकरण आणि ट्राफीक
५) पुण्यात कोरोना चाचण्या अधिक होत आहेत
६) कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर पार्टी, लग्न आणि सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या वाढली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Covid cases, Maharashtra, Mumbai, Pune