पुणे, 01 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार चेतन तुपे (Chetan tupe) यांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला आहे. खरंतर आमदार झाल्यापासूनच त्यांनी एक व्यक्ती एक या सिद्धांतानुसार, हे पद सोडण्याचा तयारी पक्ष नेतृत्वाकडे दाखवली होती. पण पर्यायी चेहरा मिळेपर्यंत पक्षानेच त्यांना या पदावर राहण्यास सांगितले होते. त्यांच्या राजीनाम्याने पुणे शहर राष्ट्रवादीत पुन्हा एकदा संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहे.
कोरोना आजारातून बरे होताच चेतन तुपे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी पुणे दौऱ्यात यासंबंधी चर्चा करून शहराध्यक्ष पदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. नव्हे रितसर तसं विनंतीवजा पत्रच सादर केले आहे.आमदार या नात्याने हडपसर मतदारसंघासाठी वेळ देता यावा, म्हणून आपण मला शहराध्यक्ष पदातून मुक्त करावे, असं कारण चेतन तुपे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
22 तास मृतदेह रुग्णालयातच पडून; बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत हे संघटनात्मक बदल होणार असल्याने आतापासून अनेक इच्छुकांनी शहराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण खात्रीलायक सूत्रांनुसार, या पदासाठीचा पहिला निकष हा महापालिकेच्या राजकारणाचा दांडगा अनुभव असणार आहे. कारण सध्या भाजपच्या ताब्यात असलेली पुणे महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी आसुसलेली आहे. हा निकष गृहित धरायचा झाल्यास प्रशांत जगताप आणि दत्ता धनकवडे हे दोन माजी महापौर तसंच दीपक मानकर, आमदारकी लढवलेले सचिन दोडके यांची नावं शहराध्यक्षपदासाठी वर्णी लागू शकता.
IT इंजिनिअर तरुणीचा पाठलाग करून भररस्त्यात फाडले कपडे, पुण्यातील घटना
पक्षाचे युवा नेते प्रदीप देशमुख हे देखील या पदासाठी इच्छुक आहेत. पण 2022 ची आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सर्व गटातटांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकेल, असं सर्वसमावेशक नेतृत्व राष्ट्रवादीला पुणे शहराला द्यावं लागणार आहे.
चेतन तुपे हे गेली अडीच वर्षे या पदावर होते. त्याआधी खा. वंदना चव्हाण यांनी तर तब्बल 8 वर्षे हे पद सांभाळलंय. त्यामुळे पुणे शहराचा अध्यक्ष निवडताना राष्ट्रवादीला सुसंस्कृत चेहराच पुढे करावा लागणार आहे. कारण पक्षात अनेक स्वयंभू सरदार आहेत पण ते या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे अजित पवार, शरद पवार यांच्यासोबतच सुप्रिया सुळे यांना मान्य असलेलाच पदाधिकारीच राष्ट्रवादीचा आगामी शहराध्यक्ष असू शकतो, हे उघडच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.