पुणे, 21 फेब्रुवारी : पुण्यात भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात सर्वपक्षीय दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते. मात्र राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना या नेत्यांच्या समोरच सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्ण फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यामध्ये विवाह सोहळ्यासाठी फक्त 200 लोकांना परवानगी दिली जाईल, असं नुकतंच प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र धनंयज महाडिक यांच्या सुपुत्राच्या लग्न सोहळ्याला मात्र 700 ते 800 लोक उपस्थित असल्याची माहिती आहे.
या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. मात्र यातील काही नेत्यांनीच मास्क घालणं टाळलं होतं. तसंच या नेत्यांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
विशेष म्हणजे आज दुपारीच प्रवीण दरेकर यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी आमदाराच्या शाही विवाहातील गर्दीवरून सरकारवर टीका केली होती. मात्र आता इकडे पुण्यातही भाजपच्या माजी खासदाराच्या मुलाच्या लग्नात नेमकं तेच चित्र बघायला मिळालं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारही या विवाह सोहळ्याला येणार होते. पण त्यांनी नंतर टीका नको म्हणून लग्नाला येण्याचं टाळल्याचं समजते. पुण्यातील अंशत: लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांनी पीडीसीसी बँकेची सर्वसाधारण सभाही टाळली. आपणच कोरोना सोशल डिस्टन्सचे निर्बंध लादणार आणि पुन्हा आपणच नियम तोडायला नको म्हणून अजित पवारांनी हा निर्णय घेतला.