पुणे, 02 ऑक्टोबर: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात राज्यात सर्वदूर मुसळधार पावसानं (Rain in maharashtra) हजेरी लावली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचा (Gulab Cyclone) महाराष्ट्राला चांगलाच फटका बसला आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळला (heavy rainfall) आहे. याचा सर्वाधिक फटका नाशिक आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून वाहून गेली आहे. याचा मोठा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
तसेच सध्या अरबी समुद्रात घोंघावणारं शाहीन चक्रीवादळ (Cyclone Shaheen) भारतीय किनारपट्टीपासून दूर गेलं आहे. असं असतानाही राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाचही दिवस पुण्याला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुण्यासाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-92 दिवसात 99 कोटी डोस! भारत साध्य करू शकेल का कोरोना लसीकरणाचं लक्ष्य?
भारतीय हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वरुणराजा कोसळणार आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहेत. त्यामुळे या भागात राहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे.
हेही वाचा-कोरोनाचा नायनाट करण्यासाठी तब्बल 20 औषधं Pipeline मध्ये, फक्त...
खरंतर, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानं आता लवकरच परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याच्या सुधारीत अंदाजानुसार, 6 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. राजस्थानातून परतीचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी किमान दहा दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Weather forecast, महाराष्ट्र