पुणे, 06 ऑगस्ट: मागील जवळपास दोन आठवड्यांपासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. सध्या मान्सूनने उत्तर भारतात मार्गक्रमण केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांशी राज्यांत पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. पुढील किमान आठवडाभर राज्यात हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अपवादात्मक सरी कोसळण्याची (Light rain) शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाअभावी पीके सुकण्याचा धोका निर्माण होतं आहे.
पुढील पाच दिवस राज्यात कोकण आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या वायव्य मध्य प्रदेशात देखील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश, ओडीसा या क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थानच्या गंगानगरपासून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतासह ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं?
पश्चिम किनारपट्टीवर वाहणार जोरदार वारे
राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसानं दडी मारल्यानं राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहे. पुढील पाच दिवसांत पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर देखील वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-सावधान! कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही; 'हे' राज्य वाढवतायेत चिंता
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून अलीकडे वर्तवण्यात आली होती. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातून मान्सून पूर्णपणे गायब झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचं लॉकडाऊन राहण्याची शक्यता आहे. पण सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Weather forecast