पुणे, 11 मे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे कल्याण-अहमदनगर महामार्ग ते मुक्ताई मंदिर असे रस्त्याचे काम सुरु असून रस्त्यावर लागणाऱ्या पाण्याची संबंधित ठेकेदारांकडून पिंपळगाव जोगा कालव्यातून पाणी टँकरने भरून दिवसाढवळ्या पाणीचोरी केली जात आहे. चोरी करणारा टँकर क्रमान MH12 GT 5959 असा असून कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पाटबंधारे खात्याकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
यंदा धरणात पाणीसाठा मुबलक असल्याने पिंपळगाव जोगा कालवा वाहता आहे. त्याचाच गैरफायदा बेल्हे परिसरात रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने उठविला आहे. रस्त्यासाठी लागणारे पाणी पाटबंधारे खात्याची कोणतीही परावाणी न घेता बेल्हे परिसरातून वाहणाऱ्या कालव्यात मोटार आणि पाईपच्या माध्यमातून चोरले जात आहे. बेल्हे हे फक्त एक उदाहरण आहे. पिंपळगाव जोगापासून कालव्याच्या शेवटच्या हद्दीपर्यंत ठिकठिकाणी अशा प्रकारची पाणीचोरी होत आहे. एवढे होत असताना पाटबंधारे खात्याने मात्र त्याकडे पूर्णपणे काणाडोळा केला आहे.
(सरकारी योजनांसाठी आधारकार्डशी कनेक्शन ते गाव-खेड्यातील पाणीटंचाईवर तोडगा, मंत्रिमंडळ बैठकीतील पाच मोठे निर्णय)
पिंपळगाव जोगा कालव्यातून शेतपिकांसाठी मोटार लाऊन पाणी घेतल्यास पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यावर पाणीचोरीचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र बेल्हे येथे रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दिवसाढवळ्या कालव्यातून पाणी चोरी होत असताना सबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही? पाटबंधार विभागाचे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पाणी चोरी केली जाते का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.