संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंना होतोय तीव्र विरोध.. त्यामागे आहे हे कारण...

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंना होतोय तीव्र विरोध.. त्यामागे आहे हे कारण...

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड,23 सप्टेंबर:उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिब्रिटो यांच्या निवडीचे सर्वत्र जोरदार स्वागत होत असताना विश्व हिंदू परिषदेने तीव्र विरोध दर्शविला आहे. विश्वहिंदू परिषदेतर्फे केल्या जाणाऱ्या या विरोधामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हामंत्री नितीन वाटकर यांनी दिब्रिटो यांना विरोध करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिब्रिटो हे सक्तीने धर्मांतर करतात आणि त्यांनी हिंदू संतांचे अंगिकारले नसल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर धक्कादायक बाब म्हणजे संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड करणे म्हणजे साहित्याकांच्या दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे सांगत नितीन वाटकर यांनी मराठी साहित्यिकांवरही टीका केली आहे.

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. गेल्यावर्षी त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे या दिग्गजांची नावे सहा महिन्यांपासून चर्चेत होती. चपळगावकर वगळता इतर सर्वांनी जाहीरपणे नकार कळवला होता. त्यामुळे मराठवाड्याबाहेरील सर्वमान्य नाव असलेल्या दिब्रिटोंना पसंती देण्यात आली आहे.

आगामी संमेलन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साहित्य सोहळा आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाची काळजी मिटली आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने त्याचेही प्रतिबिंब संमेलनावर उमटण्याची शक्यता आहे.

फादरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्या नावाची निवड ही अनपेक्षित व सुखद अशी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक मोठी जबाबदारी यानिमित्ताने माझ्यावर सोपविण्यात आली आहे आणि निश्चितपणे मी ती पार पाडीन असेही सांगितले.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

Published by: Sandip Parolekar
First published: September 23, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading