Home /News /pune /

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार? VIRAL VIDEO नंतर महापौरांनी स्वत:च सांगितलं सत्य

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार? VIRAL VIDEO नंतर महापौरांनी स्वत:च सांगितलं सत्य

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासोबच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक गावांना कोरोनाने विळखा घातला आहे.

पुणे, 14 सप्टेंबर : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासोबच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यासंदर्भात आता खुद्द पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढे येत माहिती दिली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून शहरात एका वृत्तवाहिनीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल होत असून पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनबाबत केवळ चर्चाही झाली नाही. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन होणार ही अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. पुण्यात कोरोनाचा हैदोस आणि नागरिकांचा गलथानपणा पुणे शहर कोरोना रुग्णांमध्ये देशात आघाडी घेत असताना पुणेकर मात्र नियम मोडण्यात मश्गुल असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येत आहेत. सगळी दुकानं आणि बाजारपेठा सुरू झाल्या असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचे सगळे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. पुण्यात नागरिक मास्क वापरत नसल्याचं समोर आलं आहे. कोणी फळभाज्या विकताना तर कुणी दर सांगत ओरडताना तर कुणी विकत घेताना मास्क खाली करून भाव करत आहेत. कुणी तोंडाला मास्कच लावलेला नाही, तर कुणी फक्त चहा प्यायलो म्हणून मास्क काढला, अशी कारणं सांगत आहे. यामुळे शहरात कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Lockdown, Pune news

पुढील बातम्या