पुण्यात अनोखा प्रयोग, आता थेट रिक्षातही मिळणार मराठी पुस्तके

पुण्यात अनोखा प्रयोग, आता थेट रिक्षातही मिळणार मराठी पुस्तके

27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्ताने या योजनेचा प्रारंभ झाला आहे.

  • Share this:

पुणे, 27 फेब्रुवारी : पुणे शहरात रिक्षाने प्रवास करताना तुम्हाला पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळाली तर? आता हे कसे शक्य होणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असाल; तर ‘राजहंस प्रकाशना’ने ही अनोखी संधी पुणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. ‘तीन चाकावरील राजहंसी ज्ञानदूत’ या उपक्रमांतर्गत पुणेकरांना रिक्षाप्रवासादरम्यान ‘राजहंस’ची पुस्तके खरेदी करता येणार आहेत. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्ताने या योजनेचा प्रारंभ होणार आहे.

पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी ‘राजहंस’तर्फे हा आगळीवेगळा उपक्रम सुरू केला गेला आहे. याबाबत माहिती देताना ‘राजहंस प्रकाशन’चे शिरीष शेवाळकर म्हणाले, “सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शहरातील दहा रिक्षांमध्ये वाचकांना पुस्तके खरेदी करता येतील. कालांतराने रिक्षांची संख्या वाढविण्यात येईल.”

प्रवासादरम्यान वाचकांना निवडक 10 पुस्तकांबाबतची माहिती सहज पाहता येईल अशा तऱ्हेने रिक्षात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यानंतर ही पुस्तके खरेदी करायची असल्यास संबंधित रिक्षाचालकांकडून ती विकत घेता येणार आहेत. इतकेच नाही तर ‘राजहंस’च्या सर्व पुस्तकांची यादी सदर रिक्षामध्ये उपलब्ध असेल.

या यादीतील कोणतेही पुस्तक हवे असल्यास त्याची मागणी वाचक रिक्षाचालकांकडे नोंदवू शकेल. त्यानंतर हे पुस्तक वाचकांना दिलेल्या पत्त्यावर घरपोच मिळेल. त्यामुळे वाचकांना पुस्तक खरेदीचा एक सोपा पर्याय यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. वाचनाचे प्रमाण वाढावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना त्यात आता आणखी एका अनोख्या उपक्रमाची भर पडली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 27, 2021, 9:00 AM IST

ताज्या बातम्या