कर्जमाफी केली पण पैसा कुठून आणणार, रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

कर्जमाफी केली पण पैसा कुठून आणणार, रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाविकास आघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली.

  • Share this:

पुणे,22 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर रिपाईचे नेते आणि केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कर्जमाफी केली पण पैसे कुठून आणणार, सातबारा कोरा का नाही केला, असा सवालही रामदास आठवले यांनी केला आहे.

रिपाईची कार्यकारिणीची पुण्यात रविवारी बैठक झाली. 1 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात आले आहे. बैठकीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळं व्हावं, असा सल्ला देत मंत्रिमंडळ विस्तार कधी? असा सवाल ठाकरे सरकारला केला.

आंदोलनाचा दिला इशारा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांची कर्ज माफी करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. CAA आणि NRC विरोधात गैरसमजातून आंदोलन सुरू आहेत. हा कायदा मुस्लिम विरोधी नाही, त्यांना चिथवण्यात येत आहे. हे आंदोलन दूर्दैवी, मुस्लिमांनी शांतता राखावी, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

शरद पवारांच्या 'एल्गार' वर आठवलेंचे उत्तर

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही, पुणे पोलिसांची तत्कालीन कारवाई समर्थनीय असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा, हिंसेने काहीही साध्य होत नाही. महामंडळ नियुक्त्या मध्येच बरखास्त करता येणार नाहीत, तसे केल्यास कोर्टात जाऊ, असा इशारा आठवलेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंवर भाजपचा घणाघात, शेतकरी कर्जमाफीवरून जोरदार टीका

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर भाजप असमाधानी असून भाजप नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे, 'सरसकट कर्जमाफी देऊ असं म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे,' असा हल्लाबोल भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं ठाकरे सरकारचं आश्वासन फोल ठरलं आहे. सरकारने फक्त 2 लाखांची तुटपुंजी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले असून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. फक्त 2 लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असताना सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

सरकार स्थापन करताना हे शेतकऱ्यांना समर्पित असल्याचा कांगावा करण्यात आला. सरकारने एक प्रकारे शेतकऱ्यांची मोठी चेष्ठा केली असून नाममात्र झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्याच्या जखमेवर फुंकर न घालता मीठ चोळण्याचे काम करण्यात आले आहे, अशी जहरी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 22, 2019, 5:09 PM IST

ताज्या बातम्या