उद्धव ठाकरे, शरद पवारांचे फोटो मॉर्फ करुन FB, WhatsAppवर बदनामी; पुण्यात 13 जणांवर FIR

उद्धव ठाकरे, शरद पवारांचे फोटो मॉर्फ करुन FB, WhatsAppवर बदनामी; पुण्यात 13 जणांवर FIR

सोशल मीडियात अनेकजण राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करतात अशा व्यक्तींविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • Share this:

पुणे, 6 मे: सोशल मीडियात (Social media) राजकीय नेत्यांवर टिप्पणी करणे तसेच फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह वाक्यांचा उपयोग करणं पुण्यातील तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर काही जणांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भादवी कलम 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

वाचा: बुधवार पेठेतील प्रेयसीला छळले, कुख्यात गुंडाने पोलिसाचा चिरला गळा, पुण्यातील प्रकरणाचा खुलासा

या संदर्भात तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत त्याने म्हटलं होतं, वरील आरोपींनी फेसबूक, व्हॉट्सअप, ट्विटरवर विविध ग्रुपवर शत्रूत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वाच्या लौकीकास बाधा आणण्याकरीता त्याचे फोटो मॉर्फ करुन तसेच घाणेरड्या व अश्लिल पोस्ट करुन सोशल मीडियात बदनामीकारक पद्धतीने प्रसारीत करुन त्यांची बदनामी केली.

सोशल मीडियात अशा प्रकारे पोस्ट करणं या तरुणांना चांगलेच भोवले आहे. त्यामुळे तुम्हालाही जर फेसबूक, व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमांत अशा प्रकारच्या पोस्ट ग्रुपवर आल्या तर त्या फॉरवर्ड करु नका अन्यथा तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Published by: Sunil Desale
First published: May 6, 2021, 5:45 PM IST

ताज्या बातम्या