जुन्नर, 03 ऑगस्ट : राजकीय मंडळी दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी खूपच पटाईत असतात, हे अनेकदा आपण पाहिलं असेल. हे मोठ्या शहरात नेहमी घडतं. मात्र, याचाच प्रत्यय आलाय ग्रामीण भागात आणि तोही पाणी पूजनाच्या निमित्ताने. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील पेमदरा येथील एका तलावाच्या बाबत हा प्रकार घडला आहे. एकाच दिवशी दोन वेळा या तलावाचे जलपूजन झाले. यानिमित्त तब्बल 33 वर्षांनी तलावाच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांची धडपडही पहायला मिळाली.
आणे पठारावर पेमदरा गावच्या हद्दीत चोळीचा बंधारा नावाचा लघु बंधारा असून या बंधाऱ्याचे काम शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांच्या प्रयत्नातून झाले. हा तलाव तयार झाल्यापासून दुसऱ्यांदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूर्ण क्षमतेने भरला असून पहिल्यांदा या तलावाचे जलपूजन तत्कालीन कामगार मंत्री साबीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यंदा हा तलाव जुलै महिन्यातच पूर्ण भरला असून शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणे पठारच्या वतीने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य पांडुरंग पवार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे सदस्य बाळासाहेब खिलारी, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य धोंडीभाऊ पिंगट आणि आणे पठारावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हा जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर काही वेळातच पठारावरील भाजपचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत सदस्य अमोल शिंदे,पेमदरा गावचे तत्कालीन सरपंच कृष्णा रामभाऊ बेलकर व बजरंग दल आणे पठार यांच्या वतीने पुन्हा एकदा जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
"चोळीचा बंधारा शिवसेनेचे सरकार असताना माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी कामगार मंत्री साबीर शेख व माजी प.स.सदस्य तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रयत्नातून झाला असून इतरांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये" असं माजी सरपंच कृष्णा बेलकर यांनी आवर्जून सांगितलं.
आणे पंचक्रोशीत या दोन वेळा झालेल्या जलापूजनाची चर्चा चांगलीच रंगली आहे. राजकीय नेते श्रेय घेण्याच्या प्रयत्नात चांगलीच चमकोगिरी करतात हे मात्र यातून उघड झाले.