पुणे, 19 जानेवारी : सध्याच्या जगात घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागेल याचा नेम राहिला नाही, असं म्हटलं जातं. त्यातच सार्वजनिक ठिकाणी अनेकदा चोरीच्या घटनाही समोर येत असतात. मात्र पुण्यातील PMPLच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचं अनोखं उदाहरण समाजासमोर घालून दिलं आहे.
पीएमपीएमएलच्या वाहक आणि चालक यांनी 40 हजार रुपये किंमतीचा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला आहे. पीएमपीएमएलच्या स्वारगेट आगारातील सेवक दत्तात्रय कोळपे ( कायम वाहक क्र. 1291 ) व सुनिल शेलार (चालक क्र. 4196) यांना 18 जानेवारी रोजी मॉर्निंग शिफ्टमध्ये मार्ग क्रमांक 117/11 या मार्गावर कर्तव्य बजावत असताना ईशा जोशी यांचा अॅपल कंपनीचा 40 हजार रुपये किंमतीचा आय फोन मोबाईल सापडला.
वाहक दत्तात्रय कोळपे व चालक सुनिल शेलार यांनी खातरजमा करून ईशा जोशी यांना कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांच्या समक्ष प्रामाणिकपणे मोबाईल परत केला. वाहक . दत्तात्रय कोळपे व चालक सुनिल शेलार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे ईशा जोशी यांनी त्यांना मिठाईचे बॉक्स देऊन आभार मानले.
श्री. कोळपे व श्री. शेलार यांचे कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी कौतुक करून अभिनंदन केलं. तसेच यामुळे पीएमपीएमएलच्या नावलौकिकात भर पडल्याचे गौरव उद्गार देखील सतिश गाटे यांनी काढले.
दरम्यान, या घटनेनंतर पीएमपीएमएलच्या या दोन कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.