दौंड, 15 जानेवारी : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये 48 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, कुसेगाव याठिकाणी सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर दोन गटात मारामारीची घटना घडली आहे.
दौंड तालुक्यामध्ये 48 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. कुसेगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटामध्ये अचानक वाद पेटला. तुफान हमरा-तुमरीचे रूपांतर भांडणात झाले आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन गटातील बाचाबाची थांबली.
मात्र, हा सगळा प्रकार मतदान केंद्राच्या आवारात झाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता. मात्र, याला कुठे तरी तडा गेल्याचे दिसून आले. सध्या कुसेगाव येथे सुरुळीत मतदान सुरू असले तरी भांडणानंतर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तणावाचे वातावरण झाले होते. अद्याप या प्रकरणाचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat